औरंगाबादः होळी आणि धुळवडीच्या (Holi celebration) सुटीनिमित्त शहरात दोन वर्षानंतर चांगलंच उत्साहाचं वातावरण आहे. धुळवडीच्या दिवशीच्या अनेकजण रंग खेळण्यासाठी दौलताबाद परिसरातील फार्म हाऊसची (Farm house in Daulatabad) वाट धरतात. यानिमित्त अनेकजण पार्टीचे बेत आखतात. यंदा तर धुळवडीच्या दिवशी शुक्रवार आणि त्यानंतर शनिवार रविवार अशा सुट्या आल्या आहेत. मात्र शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी, याकरिता पोलीस प्रशासनाने काही आदेश दिले आहेत. त्यानुसार, दौलताबाद हद्दीतील सर्व फार्म हाऊस शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. दौलताबादच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी गुरुवारी यासंदर्भातले आदेश दिले (Aurangabad police) आहेत. त्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी दौलताबाद परिसरातील फार्म हाऊसवर पार्टीचा बेत आखत असाल तर तो तुम्हाला रद्द करावा लागणार आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर दौलताबाद पोलीस ठाण्यात शांतता समिती तसेच परिसरातील हॉटेल चालक, मालक, फार्महाऊस धारक यांची बैठक घेण्यात आली. दौलताबादच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक गुरुवारी पार पडली. त्यात परिसरातील सर्व फार्महाऊस धारकांना बोलावण्यात आले होते. यावेळी बोलताना मिसाळ म्हणाल्या, होळी आणि धुळवडीचा सण सर्वांनी शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेश पोलीस आयुक्त कार्यालयाकडून आले आहेत. तसेच बेकायदेशीरपणे पार्ट्यांचे नियोजन करणे पूर्णपणे बंद ठेवावे, अशाही कडक सूचना देण्यात आल्या आहेत. हे आदेश पाळण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी फार्महाऊस बंद ठेवण्यात येतील.
औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद परिसरातच बहुतांश फार्म हाऊस आहेत. मात्र ते शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत कोणीही आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हॉटेल चालकांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. होळी, धुळवडीच्या निमित्ताने अवैध धंडे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही मिसाळ यांनी या बैठकीत बजावले. या बैठकीला दौलताबाद हद्दीतील सर्व फार्महाऊस धारक, हॉटेल चालक व मालक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे, पोलीस अंमलदार रफिक पठाण राजेंद्र सोनवणे, निलेश पाटील, परमेश्वर पळोदे आदी उपस्थित होते.
इतर बातम्या-