औरंगाबादः कोरोना काळानंतर यंदा प्रथमच मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या होलिकोत्सवासाठी औरंगाबाद (Aurangabad Holi) सज्ज आहे. गुलमंडीवरील होळीकरिता येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर शहरातील मानाची होळी अर्थात संस्थान गणपतीसमोरची होळी संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आली आहे. होलिकोत्सवाच्या (Holi celebration) शुभेच्छा देणारे मोठे बोर्ड शहरात ठिकठिकाणी झळकले आहेत. तसेच कॉलन्यांमध्येही चौका-चौकात होळीसाठी एरंड्याचे झाड आणून बच्चे कंपनी आणि तरुणांनी होळीची तयारी सुरु केली आहे. संस्थान गणपतीसमोरील (Sansthan Ganapati) शहरातील मुख्य होळीचीदेखील तयारी झाली आहे. या होळीला शहरातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते, अधिकारी, पोलीस आयुक्त आदींची उपस्थिती असेल.
शहरातील मानाच्या होलिकोत्सवाची वेळ संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अशी नियोजित करण्यात आळी आहे. यासाठी संस्थान गणपती विश्वस्त मंडळातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता विधीवत होळी पेटवली जाईल.
धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून राजाबाजार येथून निघणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. यंदादेखील या मिरवणुकीसाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शहरात जमावबंदीचे आदेश लागू असून नियमाचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्य सरकारने धुळवड आणि होळीसाठी काही नियम जारी केले आहेत. ते पुढील प्रमाणे-
– रात्री 10 च्या आत होळीचे पूजन करून ती पेटवावी
– डीजे लावण्यास बंदी
– बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
– महिला व मुलींबाबत खबरदारी घ्यावी.
– पायी किंवा वाहनावर रॅली काढण्यास परवानगी नाही.
– कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नयेत.
– जबरदस्तीने रंग लावू नये. कोणावरही पाण्याचे फुगे फेकू नयेत.
– कुणीही दुचाकीवर तिघे बसू नये. कारच्या टपावर बसू नये. तसे आढळल्यास कारवाई केली जाईल.
इतर बातम्या-