औरंगाबादः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या घरीही काल होळी साजरी केली गेली. गुरुवारी संध्याकाळी डॉ. भागवत कराड यांच्या घरी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी सात वाजल्याच्या नंतर होळी पेटवण्यात आली. त्यात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या नावानं बोंबा मारल्या. होळीच्या दिवशी (Holi celebration) शिव्या देण्याची प्रथा असते. या निमित्ताने मनातील द्वेष, मत्सर जाळून टाकण्यात येत असतो. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही विरोधक असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. डॉ. भागवत कराड यांचे संपूर्ण कुटुंब यावेळी होलिकोत्सवात सहभागी झाले होते.
दरम्यान, टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी डॉ. भागवत कराड यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लहानपणी कशा प्रकारे होळी खेळत होते, याच्या आठवणी सांगितल्या. होळीचा सण आम्ही लहानपणी आमच्या गावात आणि नंतर औरंगाबादमध्ये साजरा करत होतो, असे कराड यांनी सांगितलं. ते म्हणाले, होळीच्या आग आगीत मत्सर, द्वेषाचा त्याग करून उद्यापासून नवीन आशा आकांक्षा घेऊन जगायचं असतं. त्याचप्रमाणे आजही आम्ही होळी पेटवली असून उद्या धुळवडीचा आनंद साजरा करणार आहोत. हा खूप आनंदाचा क्षण आहे, असं डॉ. कराड म्हणाले.
होळीच्या निमित्ताने देवाला काही साकडं घालायचं असेल तर काय घालणार, असा प्रश्न विचारल्यावर डॉ. भागवत कराड म्हणाले, महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी राज्यात भाजपचं सरकार येऊ दे, अशीच प्रार्थना आहे.
दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरीही धुळवडीचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यांच्या वाढदिवसाचेही सेलिब्रेशन झाले. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद साजरा केला.
शहरात गुरुवारी संस्थान गणपतीसमोर मानाची होळी पेटवण्यात आली. यावेळी सर्व पक्षांचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांची उपस्थिती होती. अनेक वर्षांपासून शहरातील मानाची होळी या ठिकाणी पेटवण्याची प्रथा आहे. यावर्षीदेखील ती सुरु राहिली.
इतर बातम्या-