औरंगाबादः 60 पेक्षा जास्त वर्षांपासून ज्या घरांनी भक्कमपणे साथ दिली.. लहान पोरं, बापाच्या वयात गेली, बाप आजोबाच्या भूमिकेत गेले, लेकी सुना झाल्या, आजीच्या वयातही गेल्या.. माणसं मोठी झाली. डोक्यावरचं छत कधी उडूनही जाऊ शकतं, ही कल्पनाही कधी मनाला शिवली नाही. पण अचानक घरांचा ताबा आता सोडावा लागणार, या बातमीनं काही वर्षांपूर्वी लेबर कॉलनीवासियांना (Labor colony) धक्का बसला. 1953च्या दशकात बांधलेल्या लेबर कॉलनीतील अनेक घरातील शासकीय कर्मचारी (Government employee) निवृत्तीनंतरही येथेच राहत आहेत. काहींनी इतरांना घरे विकली. काहींनी पोटभाडेकरू ठेवले. मात्र ही जागा जिल्हा प्रशासनाच्या (Aurangabad district) मालकीची असून ती सोडावी लागणार हे ऐकून रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रशासनाविरोधात लढा सुरु झाला. कोर्टकचेऱ्या झाल्या. अनेकांनी कोर्टाच्या खेट्या घातल्या. पण शासकीय नियमानुसार, ही जागा जिल्हा प्रशासनाची असल्याचं अनेकदा सिद्ध झालं अन् रहिवाशांना घरं सोडण्याचे आदेश देण्यात आले. घरं सोडण्यासाठी अनेकदा मुदतही देण्यात आली. पण ही घरं म्हणजे केवळ उभ्या भिंती थोडी होत्या, उभं आयुष्य ज्यानं डोक्यावर छत दिलं तो आसरा होता. उन्हा-पावसापासून संरक्षण देणारी, अनेकांच्या आय़ुष्यातील चढ-उतार, सुख-दुःख पाहिलेली ही घरकुलं होती. प्रशासनाच्या सूचना आल्यानंतर अनेकांनी दुःखाचा आवंढा गिळत सामानाची बांधाबांध सुरु केली. काहींनी बाहेरचा रस्ता धरला. पण काहीतरी चमत्कार होईल अन् आपली घरं वाचतील, आपल्याला इथेच राहण्याची परवानगी मिळेल, या भाबड्या आशेवर राहिलेली काही मंडळी. आज 11 मे 2022 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे येथील जीर्ण घरांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरु झाली अन् क्षणार्धात उभ्या घरांचे ढिगारे बनले. आशेला लागलेल्या माय माऊलींसह त्यांचे संसार बेघर झाले.
घरातलं सिलिंडर, पाण्याची, स्वयंपाकाची भांडी रस्त्यावर येऊन पडली, कपड्यांसहित कपाटं उघड्यावर आली. डोळ्यादेखत संसाराची ही अवस्था पाहून रहिवाशांना अश्रू अनावर झाले. हे दुःख कथन करताना एक महिला म्हणाली, 50 वर्षांपासून संसार केला. आशा लावून बसलो होतो. सरकारनं कारवाई करताना आमचं काय होईल, एवढापण विचार केला नाही…. कलेक्टर, मंत्री, खासदारांना बोललो, पण सगळेच आमच्या मागे हात धुऊन लागले आहेत… आई रडत होती अन् मागे उभी होती, दोन चिमुरडी पोरं.. घरावर काय आभाळ कोसळलंय, याची कल्पना कदाचित या वयात त्यांना नसावी. पण महिलेच्या डोळ्यातले अश्रू आणि पुढील आव्हानं स्पष्ट दिसत होती.
लेबर कॉलनीतील घरांवरील पाडापाडीची कारवाई जवळपास पूर्ण झाली आहे. घरातील सामान उघड्यावर पडलेल्या नागरिकांसमोर आता कुठे जावे, हा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रहिवासी करत आहेत. तुटपुंज्या पगारात भाड्याच्या घरात राहणं कसं शक्य आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. घरांचे ढिगारे झाले तसे रहिवाशांसमोर अडचणींचा डोंगर आहेत. या प्रश्नावर आता स्थानिक प्रशासन काय मार्ग काढते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.