औरंगाबादः लेबर कॉलनीतील (Labor colony) शासकीय वसाहतीतील 338 घरांवर अखेर जिल्हा प्रशासनातर्फे (District administration) बुलडोझर चालवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांचा प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात लढा सुरु आहे. मात्र कोर्टानेही (Aurangabad court) वारंवार जिल्हा प्रशासनाची बाजू घेतल्यामुळे अखेर आज कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई केली जाईल. लेबर कॉलनीतील रहिवासी, राजकीय पक्ष, संघटनांकडून या कारवाईला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आज बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 751 पोलीस अधिकारी कर्मचताऱ्यांसह तीन दंगा काबू पथके तैनात करण्यात आली आहे. शहरातील 17 पोलीस ठाण्यांचे प्रभारी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह यावेळी हजर असतील.
लेबर कॉलनीतील पाडापाडीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी 30 जेसीबी, 8 पोकलेनसोबत 200 मजूर तैनात करण्यात आले आहेत. संध्याकाळी या पथकांनी सर्व घरांचे वीज, पाणी कनेक्शन बंद केले आहेत. अनेक नागरिकांनी आपले सामान घेऊन स्थलांतर केले आहे, मात्र काही नागरिक अजूनही कॉलनी सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
– पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह तीन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 59 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 511 अंमलदार व 144 महिला अंमलदार यांच्यासह तीन दंगाकाबू पथकं तैनात करण्यात आली आहेत..
– नियंत्रण कक्षात चार स्ट्रायकिंग फोर्स तयार आहेत.
– काही अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रत्येकी एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, 10 पुरुष, 04 महिला कर्मचाऱ्यांचे पथक तयारीत असतील.
– राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका, हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल.
– लेबर कॉलनीच्या चारही बाजूंनी महत्त्वाचे रस्ते लागतात. त्यामुळे या परिसराकडे जाणाऱ्या 15 मार्गांवर पोलिसांनी ब्लॉकिंग पॉइंट तयार केला आहेत.
– पोलीस, मजुरांव्यतिरिक्त इतरांना या परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
– हर्सूल टी पॉइंटकडून दिल्ली गेटमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी व येणारी एसटी महामंडळ, इतर सर्व वाहने हर्सूल टी पॉइंट ते जळगाव टी पॉइंटमार्गे पुढे जातील.
– उद्धवराव पाटील चौक, सत्यविष्णू रुग्णालय, एन-12 टीव्ही सेंटरमार्गे पुढे जातील.
– भडकल गेट तसेच टाऊन हॉलकडील वाहने मनपा, जुना बाजार, सिटी चौक पोलीस ठाण्यासमोरून पुढे जातील.
– पंचायत समिती कार्यालयासमोरून चंपा चौक मार्गे वाहने पुढे जातील.