औरंगाबादः औरंगाबादमधील वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पर्यटकांसाठी (Tourist) बंदच करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. खुलताबाद येथील नागरिकांनी आज अचानकपणे कबरीला पाहण्यासाठी पर्यटकांनी येऊच नये, अशी मागणी केली. पर्यटकांनाही कबर परिसरात येऊ दिलं नाही. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केलं. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ही मशीद उखडून टाकण्याचीही भाषा करण्यात आली. राज्य सरकारकडे तशी मागणीही करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची अज्ञातांकडून मोडतोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना या मशिदीत येण्यास परवानगीच न देण्याचा आग्रह स्थानिक करत आहेत.
12 मे रोजी एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून शहरातील शिवसेना नेते तसेच भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती संभाजी राजेंची हत्या करणाऱ्या, तसेच स्वतःच्या भावालाही जीवानीशी मारणाऱ्या, जनतेचा क्रूर छळ करणाऱ्या औरंगजेब बादशहाच्या समोर कुणी नतमस्तक होऊच कसं शकतं? असा सवाल विचारला गेला. महाराष्ट्रात राहून ही हिंमत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. डॉ. भागवत यांनी तर औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर उखडूनच का टाकू नये, असा प्रश्न विचारला. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुघलांचा शेवटचा बादशहा औरंगजेब याचा मृत्यू 3 मार्च 1707 साली नगर येथे झाला. त्याचा मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत ऊन निस्सा यांनी त्याचा दफन विधी खुलताबाद येथे केले. हे ठिकाण औरंगाबादपासून 20 ते 22 किलोमीटर लांब आहे. आपला दफनविधी खुलताबादमधील शेख झैन उद दिन (औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरू) यांच्या दर्ग्याजवळ करावी, अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती. त्यामुळे त्याचा दफनविधी खुलताबादमध्ये करण्यात आला.