औरंगाबाद – पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद (Aurangabad) आज जगाच्या पाठीवर औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात येणारे कौशल्य विद्यापीठ औरंगाबाद येथे स्थापन करण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांनी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सतीश चव्हाण यांनी राजेश टोपे (Rajesh Tope) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे या उद्देशाने राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.
17 फेब्रुवारी 2021 रोजी मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत सदरील विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देखील देण्यात आली. पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद आज जगाच्या पाठीवर औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर 2019 मध्ये शेंद्रा औद्योगिक वसाहत याठिकाणी औरंगाबाद इंडस्ट्रइल सिटी (ऑरिक) चे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी उद्योगांना अनेक अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर आता ‘एज्युकेशन हब’ म्हणून देखील औरंगाबादची ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक मोठ्या प्रमाणावर रोजगार व शिक्षणासाठी औरंगाबादची निवड करत आहेत. कौशल्य विद्यापीठ औरंगाबादेत सुरू झाले तर येथील शैक्षणिक वातावरणाला आणखी बळकटी मिळेल. शिवाय येथील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जून 2014 मध्ये देशभरात 6 नवीन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) सुरू करण्याची घोषणा केली होती. औरंगाबादसाठी मंजुर झालेले ‘आयआयएम’ ऐनवेळी नागपूरला हलवण्यात आले. एप्रिल 2016 मध्ये भारतीय खेळ प्राधिकरणच्या (साई) विभागीय केंद्रासाठी औरंगाबादचे नाव आघाडीवर असताना सुध्दा हे केंद्र देखील नागपूरला हलवले. केंद्र सरकारने जुलै 2014 मध्ये देशात चार नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता मात्र ही संस्था देखील शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून नागपूरला सुरू करण्यात आली. त्यामुळे कौशल्य विद्यापीठ तरी आता औरंगाबाद येथे सुरू व्हावे अशी इच्छा मराठवाड्यातील नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.