औरंगाबाद: शहरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कडाका (Summer temperature) वाढला असून सध्या औरंगाबादचे तापमान चाळीशीच्या पार पोहोचले आहे. त्यातच महावितरणतर्फे (MSEDCL) शहरातील अनेक भागांमध्ये अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासियांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वीजपुरवठा (Electricity) खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोन धडकत असून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीयेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या कार्यालयातही लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असून ऐन उन्हाळा आणि सणासुदीच्या दिवसात नागरिकांना त्रास देऊ नये, असा इशारा औरंगाबाद मनसेतर्फे देण्यात आला.
मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयाला यासंबंधीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, सध्या सर्व ठिकाणी अघोषित लोड शेडिंग सुरू झाली आहे, कालपासून मनसेच्या कार्यालयावर लोकांनी येऊन व्यथा मांडल्या आहेत, सर्व सामान्य जनतेचे सण तोंडावर आहेत. रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जन्मोत्सव, ईद सर्वच सण तोंडावर आहेत. अश्या परिस्थितीत जनतेस त्रास देऊ नये, भारनियमन करू नये, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या विनंतीनंतरही भारनियमन झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
औरंगाबाद मनसेने निवेदनात तीन गोष्टींचा इशारा दिला आहे-
– महावितरण कॉल सेंटरवर सर्वसामान्यांचे फोन उचलले जात नाहीत, तो विषय मार्गी लावावा.
– दुपारी करण्यात येणारे लोडशेडिंग आज-आत्तापासून बंद करावे
– रेग्युलर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली असून वीजनिर्मितीवर याचा परिणाम झाला आहे. औष्णिक वीजनिर्मितीसाठीही मुबलक पाणी साठा नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आता खासगी कंपनीकडून वीज विकत घ्यावी लागणार आहे. सध्या काही ठिकाणी जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्रावर हे लोडशेडिंगचं संकट कदापि येऊ देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.
इतर बातम्या-