Image Credit source: tv9 marathi
औरंगाबादः भाजपच्या जलआक्रोशापूर्वीच मनसेने (MNS) औरंगाबादमधील पाणीप्रश्न (Aurangabad water issue) उचलून धरत संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. आज 14 मेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील पाणी प्रश्नावर मोठं आंदोलन केलं जात आहे. शहरातील प्रत्येक भागात फिरून नागरिकांकडून पाणी समस्येविषयीचे पत्र लिहून घेतले जाणार आहे. मागील 25 वर्षांपासून न सुटलेल्या या प्रश्नावर मनसेतर्फे नागरिकांकडून (Aurangabad citizens) 25 हजार पत्र लिहून घेतले जाणार आहे. हे पत्र एकत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या औरंगाबादकरांना पाणी प्रश्नानेही हैराण केलं आहे. कुठे आठ दिवस तर कुठे नऊ दिवसांनी पाणी. त्यातही वेळ-अवेळी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. भाजपच्या नेतृत्वात गेल्या महिन्यापासून काही आंदोलनं झालं. त्यानंतर महापालिकेने तातडीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र पाणीपुरवठ्याची समस्या अद्याप जैसे थेच आहे.
मनसे 25 वर्षांपासूनच्या समस्येवर मनसेचे 09 प्रश्न काय ?
- 2012 मध्ये पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ त्वरित 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावी. लोकांनी 4050 रुपये पाणीपट्टी का भरावी?
- सिडको-हडको येथे 45-50 MLD पाण्याचे नियोजन त्वरीत का करण्यात येत नाही?
- मनपाच्या 85 टँकर पैकी फक्त 40 टँकर व जीपीएस लावण्यात आले आहेत. उर्वरीत टँकरवर जीपीएस का लावण्यात आलेले नाही. पाणी चोरीसाठी मनपा आणि सत्ताधारी सोबत काम करीत आहेत का?
- ज्या ठिकाणी टँकर भरले जातात, त्या ठिकाणी बारकोड यंत्रणा का बसवण्यात आली नाही? विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का झाले नाहीत?
- शहरात 250 लाइनमन आहेत, या लाइनमनला धमक्या आणि त्रास नेहमीच दिल्या जातात. याची दखल आजपर्यंत का घेतली गेली नाही?
- हर्सूल तलाव ते जटवाडा नवीन लाइन एका आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काम जमू शकते तर जायकवाडी ते नक्षत्रवाडी लाइनला 25 वर्षे वेळ का लागला?
- नवीन पाईप तयार होण्याची गती पाहता (दररोज 50 मीटर) नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी किमान दोन ते तीन वर्षे लागतील. लोकांनी हे का सहन करावे?
- प्रधान सचिवांना निवडणुकीच्या तोंडावर कामाची पाहणी करण्यास पाठवले. मग एवढे दिवस ते कुठे होते?
- किमान 16 MLD पाणी दररोज वाया जाते, म्हणजेच 1,50,000 लोकांना पुरेल इतके पाणी रोज वाया जाते. या गोष्टीला जबाबदार कोण?