औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेसाठी औरंगाबाद मनसेकडून (Aurangabad MNS) जय्यत तयारी केली जात आहे. येत्या 01 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता औरंगाबाद मनसेतर्फे जय्यत तयारी केली जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील मनसेने वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातून सभेचे काऊंटडाऊन सुरु करण्यात आले आहे. आता शहरात आणि सभेच्या ठिकाणी झळकवण्यासाठी मनसेचे लाखो ध्वज तयार केले जात आहेत. मनसेचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि नितीन सरदेसाई हेदेखील आज औरंगाबादमध्ये येत आहेत.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे आज औरंगाबादेत दाखल होणार आहेत. आजपासून राज ठाकरे यांची सभा संपेपर्यंत बाळा नांदगावकर औरंगाबादमध्ये राहतील. मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे हेदेखील कालपासून शहरात तळ ठोकून आहेत. बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या सभेची परवानगी मिळवणे आदी कामांसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतील. तसेच सभेसाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतील.
राज ठाकरे यांच्या सभेला चार दिवस बाकी असताना पक्षातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. मनसेच्या कार्यालयात लाखोंच्या संख्येने तयार झालेले ध्वज दाखल झाले आहेत. सभेच्या ठिकाणी तसेच शहरभर ते झळकवले जातील. तसेच प्रत्येक वॉर्डात मनसेची निमंत्रण रॅली चालून असून लोकांना सभेसाठीचं आमंत्रण दिलं जात आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. येत्या दोन दिवसात यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असं वक्तव्य औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काल केलं होतं. दरम्यान, आज शहरात येत्या काळातील सण-उत्सव आणि राजकीय सभा आंदोलनांची परिस्थिती पाहता, शहरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.