औरंगाबादः मनपाने औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी. सद्यस्थितीत नागरीकांकडे थकीत असलेली पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांना खासदार जलील यांनी अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. औरंगाबाद शहराला वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावे यासाठी सर्वसामान्य नागरीकांनी अनेकवेळा निवदने, लोकशाही मार्गाने आंदोलने तसेच आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाक्यांवर सुध्दा आंदोलने केलेली आहेत. महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाची सत्ता असतांना त्यावेळी MIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत, स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमकपणे मुद्दा उचलुन अनेक आंदालने केली. तसेच थेट लोकसभेत सुध्दा औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य नागरीकांना वेळेवर व मुबलक पाणी पुरवठा करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तरीसुध्दा मनपा व जिल्हा प्रशासनाने नागरीकांना पाणी पुरवठा व्हावा याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबविलेली नाही, असा आरोप खासदार जलील यांनी केलाय.
‘फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे ठेवून पालकमंत्री सुभाष देसाई यांनी हा निर्णय घेतालाय, शिवसेना पक्ष सत्तेत यावा म्हणून निवडणुकीत मत मागण्यासाठी सर्वसामान्य लोकांकडे जावे लागणार असल्याने पाणी पट्टी 50% माफ करण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु उर्वरित 50% टक्के पाणी पट्टी वसुली करुन सुध्दा पाणी मिळणार नाही हे विशेष !’ असे स्पष्ट मत खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले.
औरंगाबाद शहरात पाण्याचे नियोजन होवून सर्वांना समान प्रमाणात मुबलक पाणी मिळावे यासाठी शासनाने समांतर जलवाहिनी योजना मंजूर केली होती. महानगरपालिकेने योजनेचे काम स्वत: अथवा कोणत्याही खाजगी कंपनीव्दारे करु नये म्हणून मी व माझ्या पक्षाने आक्रमकपणे विरोध केला होता. समांतर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फतच पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळविले होते. जर तेव्हाच नागरीकांचा सकारात्मक विचार करुन योग्य निर्णय घेतला असता तर आज पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालीच नसती असे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
नागरीकांना वेळेवर व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा याकरिता भाजपाचे राज्याचे विरोधी पक्षनेता आक्रमकपणे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते; परंतु त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी महानगरपालिकेत आजतागायत शिवसेना सोबत सत्तेत होते मग आंदोलन कोणाच्या विरोधात होणार आहे ? मागील 30 वर्षापासून महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाची सत्ता होती; तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही ? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते असे अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्न उपस्थित करुन खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना, भाजपा व मनपा प्रशासनावर अनेक आरोप लावले.