औरंगाबादः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन चाकांसोबत एमआयएमचंही चौथं चाक जोडा, तिची मोटरकार करा.. बघा कशी चालतेय… अशी ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. या वक्तव्यामुळे शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन साकारलेल्या महाविकास आघाडीत एमआयएम शामिल झाले तर काय काय घडू शकते, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही पक्षांची विचारसरणी आणि धोरणं वेगवेगळी आहेत. त्यातच शिवसेनेचा बाणाही पूर्णपणे एमआयएमच्या विरोधात आहे. तरीही महाविकास आघाडीला एमआयएमने अशी ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चेची लाट आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची काल एक बैठक पार पडली. यात खासदार जलील यांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव दिला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काल खासदार जलील यांच्या भेटीसाठी औरंगाबादेत आले होते. जलील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टोपे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत शामिल होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीवर खोचक टीका करताना ते म्हणाले, ‘ तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय..’
खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, हे जाहीर केलं. ते म्हणाले, राजेश टोपे माझ्या घरी आले होते. बोलता बोलता ते म्हणाले, तुमच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपा जिंकली. तेव्हा मी म्हटलं, तुमच्यासाठी हे बोलणं खूप सोपं झालं आहे. जेव्हा जेव्हा MIM कुठेही निवडणूक लढवते तेव्हा तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप केला जातो. त्यामुळे आम्हीही त्यांना ऑफर दिली. चला आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. MIM भाजपची बी टीम आहे. त्यांच्यामुळे भाजपाला फायदा होतो, हे आरोप एकदाचे संपून जाऊ द्या. त्यामुळे मी स्वतःसपा आणि बसपासोबत बैठक घेतली होती. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव देत आहोत. आता तुम्ही सांगा. तुम्ही तर सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेसोबत गेलात. मग एमआयएम का नाही? माझा एवढा निरोप शरद पवार यांना द्यावा, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केलं.
इतर बातम्या-