छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. तर आता जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या अर्थात 4 मार्च पासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून या उपोषणाला सुरवात होणार आहे. याबाबत फेसबुक लाईव्ह करून जलील यांनी माहिती दिली आहे.
सरकराने आमच्या जिल्ह्याचे नाव बदलले आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवेत. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचा श्रेय मिळावा म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही. तर ज्यांना ज्यांना औरंगाबाद हेच आपल्या शहराचं नाव असावं, असं वाटतं, असे सगळे नागरिक या उपोषणाला येतील. अशा सर्व नागरिकांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहान खा. इम्तियाज जलील यांनी केलंय.
शहराच्या नामांतराच्या निर्णयाला अनेक राजकीय पक्षांनी समर्थन केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने देखील याचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना आवाज उठवला पाहिजे. नागरिक आवाज उठवत नसल्याने कोणी काहीही करत नसल्याचे सरकारला वाटत आहे. आम्हाला जे वाटेल ते जनेतेला मान्य करावे लागेल, असा समज सरकारचा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. ही फक्त आंदोलनाची एक सुरवात आहे. दिवस आणि रात्र बेमुदत असे हे उपोषण असणार असल्याचे खा. जलील म्हणाले.
खा. जलील यांच्या नेतृत्वातील हे आंदोलन लोकशाही पद्धतीने आणि शांततेत असणार आहे. यापूर्वी देखील आम्ही औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती बनवली होती. त्याच कृती समितीच्या अंर्तगत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ज्या पक्ष आणि संघटनांना आमच्यासोबत यायचं आहे, त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला तसे कळवावे. 4 मार्च पासून या उपोषणाला सुरवात होणार असून, ते किती दिवस चालेल याबाबत सांगता येणार नसल्याचे खा. जलील म्हणाले.