औरंगाबाद| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध औरंगाबादमध्ये आज व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला. शहरातील गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन (Aurangabad Agitation) केलं. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचाही जोरदार निषेध करण्यात आला. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध राज्यभरात सर्वच ठिकाणी होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध शहरांमध्ये गुणरत्न सदावर्तेंचा निषेध केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे हिंसक होण्यामागे गुणरत्न सदावर्ते यांचे प्रक्षोभक भाषण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीची चौकशी पोलिसांकडूनही सुरु आहे.
औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुणरत्न सदावर्तेंवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. शहरातील गांधी पुतळ्याजवळ सुरु असलेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील जनतेचे मागील अनेक महिन्यांपासून हाल सुरु आहेत. त्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर महामंडळाने मेस्मा अंतर्गत कारवाईदेखील केली आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या या आंदोलनाच्या संदर्भाने उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून 22 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांनी सेवेत रूजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासित करण्यात आले. मात्र 8 एप्रिल रोजी आझाद मैदानावरील शेकडो आंदोलक अचानक शरद पवार यांच्या घरासमोर जमले आणि त्यांनी पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक सुरु केली. ऐन वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळात पोलीसही घटनास्थळी आले आणि आंदोलकांची धरपकड सुरु झाली.
एसटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे भडकवण्यामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा हात असल्याचा संशय आहे. त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, असा आरोप केला जातोय. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काल मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली असून पुढील दोन ते तीन दिवस त्यांची चौकशी केली जाईल, अशी शक्यता आहे.
इतर बातम्या-