औरंगाबादः औरंगाबाद शहराला (Aurangabad city) सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. दोन वर्षांपूर्वी या योजनेचे काम सुरुदेखील झाले. मात्र काही महिन्यांपूर्वी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीदरम्यान 39 किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम अडले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात MJP तर्फे ही जलवाहिनी (water pipeline) टाकण्यासाठी भूसंपादनाच्या शुल्कापोटी 5 कोटी 80 लाख रुपये शुल्क भरलेले नव्हते. आता मात्र MJP ने ही रक्कम भरली असून सव्वा कोटी रुपयांची बँक गॅरेंटीची रक्कमही भरली आहे. त्यामुळे आता तरी पाणीपुरवठा (water supply) योजनेच्या कामांना गती मिळेल का असा प्रश्न विचारला जातोय.
नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीदरम्यान 39 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या जलवाहिनीचे अलाइनमेंटदेखील झाले होते. मात्र रस्त्याच्या बाजूने ही जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादनाच्या शुल्कापोटीची रक्कम भरणे बाकी होते. हा निधी मिळाला असून नक्षत्रवाडी येथील कारखान्यात पाइपचे पुरशा प्रमाणात उत्पादन सुरु आहे. एप्रिल महिन्यात ही मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु होईल, असा दावा एमजेपीचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी केला आहे.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये बजेटच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सप्टेंबर 2020 मध्ये केले होते.
– या योजनेअंतर्गत जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
– नवी योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
– या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 1680 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातला 30 टक्के वाटा अर्थात 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिकेला भरावा लागणार आहे. तर 1 हजार 80 कोटी रुपये राज्य सरकार भरणार आहे.
सध्या औरंगाबाद शहरातील अनेक भागांत सहा ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. एवढ्या मोठ्या विस्तारलेल्या शहराला दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी जुनी पाणीपुरवठा योजना अपयशी ठरत आहे. त्यातच प्रमुख जलवाहिनीदेखील अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने ती अनेकदा फुटते. त्याची दुरुस्ती करायची असल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आणखी एक-एक दिवस विलंबाने होतो. आठ दिवसांनी पाणी येणार अशी आशा लावून बसलेल्या नागरिकांचा हिरमोड होतो. त्यामुळे नवी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
इतर बातम्या-