Aurangabad | नव्या जलनाहिनीसाठी ‘समांतर’च्या अर्धवट कामाचे पाईप काढणार, पाणी योजनेचे काम कुठपर्यंत?

| Updated on: Mar 28, 2022 | 11:19 AM

2012-13 मध्ये समांतर जलवाहिनी योजनेचे काम SPML कंपनीला देण्यात आले होते. कंपनीच्या धीम्म कारभारामुळे मनपाने या कंपनीची हकालपट्टी केली होती. 2016 मध्ये महापालिकेने SPML सोबतचा करार रद्द करत समांतरच्या कंत्राटदाराला सोडचिठ्ठी दिली होती.

Aurangabad | नव्या जलनाहिनीसाठी समांतरच्या अर्धवट कामाचे पाईप काढणार,  पाणी योजनेचे काम कुठपर्यंत?
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद | शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या 1680 कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे (Water supply scheme) काम सुरु आहे. या योजनेसाठी आधी अर्धवट सुटलेल्या समांतर योजनेअंतर्गत (Samantar Scheme) टाकण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे पाइप उकरून काढण्यात येणार आहेत. औरंगाबादमध्ये समांतर जलनाहिनीचे कामे अर्धवट सोडून गेलेल्या कंपनीने जायकवाडी येथे 2000 मिमी व्यासाची पाच किलोमटर लांब जलवाहिनी टाकली होती. या जलवाहिनीचे पाइप उकरून काढण्यात येणार आहेत. तसेच जुन्या पाणीपुरवठा (Aurangabad water supply) योजनेत ज्या ठिकाणी जलवाहिनी पूर्णपणे खराब झालेली आहे, त्या ठिकाणी हे पाइप वापरता येतील का, याची चाचपणीही करण्यात येणार आहे. दरम्यान, समांतर योजनेतील हे पाइप काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महापालिकेची परवानगी मिळाली आहे. लवकरच ही पाइपलाइन उकरून काढली जाणार आहे.

कोणत्या भागात होणार काम?

2012-13 मध्ये समांतर जलवाहिनी योजनेचे काम SPML कंपनीला देण्यात आले होते. कंपनीच्या धीम्म कारभारामुळे मनपाने या कंपनीची हकालपट्टी केली होती. 2016 मध्ये महापालिकेने SPML सोबतचा करार रद्द करत समांतरच्या कंत्राटदाराला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यानच्या काळात कंपनीने पाणीपुरवठा योजनेसाठी बिडकीन, फारोळा, कवडगाव, गेवराई तांडा, नक्षत्रवाडी येथे एकूण 5 किलोमीटर जलवाहिनी टाकली होती. 2 हजार मिमी न्यासाची लोखंडी पाइपलाइन येथे टाकण्यात आली होती. हा करार रद्द झाल्यावर ही पाईपलाइन अशीच पडून होत. आता याच भागातून नवी पाइपलाइन जातेय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जीव्हीपीआर कंपनी हे काम करतेय. त्यामुळे समांतरच्या कामासाठी या भागातील पाइप काढण्याचे ठरवण्यात आले आहे. महापालिकेने यासाठी मंजुरीही दिली आहे. तसेच पाइप काढताना महापालिकेला कळवून आमच्या अधिकाऱ्यांसमक्ष हे काम करावे, अशा सूचना प्राधिकरणाला देण्यात आल्या आहेत.

शहरातील जलवाहिनी जीर्णावस्थेत

औरंगाबाद शहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्यांचे आय़ुष्यमान 20 वर्षांपूर्वीच संपले आहे. 1400 मिमी व्यासाची जलवाहिनी 7 किलोमीटरपर्यंत खूपच खरबा आहे. जिथे सर्वात जास्त जलवाहिनी खराब आहे, तेथे 2 हजार मिमी व्यासाचे पाइप टाकले तर चालतील का, यासंदर्भातील चाचपणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. कारण समांतरच्या कामात टाकलेले पाइप महापालिकेला कुठे तरी वापरावे लागणार आहेत.

सुरळीत पाण्याच्या प्रतीक्षेत औरंगाबादकर

औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असूनही केवळ योग्य नियोजनाअभावी, शहराला सहा ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकाराला औरंगाबादकर कंटाळले असून नवी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 1680 कोटी बजेटची नवी योजना दोन वर्षांपूर्वी सुरु झाली. तिचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करून योजना लवकर कार्यान्वित व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादकरांना दररोज 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध असेल, आश्वासन देण्यात आले आहे.

इतर बातम्या-

 बीडच्या शेतकऱ्यानं करुन दाखवलं, अधिकच्या फायद्यासाठी Market च ताब्यात घेतलं

Onion prices : आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले, 7 ते 8 रुपये किलो कांदा, शेतकरी पुन्हा चिंतेत