औरंगाबादः कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण आणि लसीकरणाचा (Corona Vaccination) टक्का या दोन निकषांवर राज्यातील 14 जिल्ह्यांवरील निर्बंध महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) हटवले आहेत. मात्र औरंगाबाद जिल्हा लसीकरणात मागे राहिल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध अद्याप कायम आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) वतीने पुन्हा एकदा लसीकरणावर भर देत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आजपासून म्हणजेच 8 मार्च पासून नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतले असतील तरच पेट्रोल, डिझेल, रेशन, गॅस मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे.
– 8 मार्च पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल मिळेल.
– रेशनच्या दुकानावरदेखील लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील तरच साहित्य मिळेल.
– लसीकरण नसेल तर दारूदेखील दिली जाणार नाही.
– शॉपिंग मॉल, सुपरमार्केट, डी मार्ट, रिलायन्स आणि मोठ्या दुकानांमध्ये दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असेल. या ठिकाणी भरारी पथक तपासणी करणार आहे.
– शहरातील पेट्रोल पंपांवरदेखील लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी तैनात केलेले असतील, ते जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती देतील.
राज्य शासनाच्या निकषानुसार, जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त होण्यासाठी 90 टक्के लोकांनी पहिला तर 70 टक्के लोकांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस 82.97 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस फक्त 53.71 टक्के लोकांनी घेतला आहे. पहिला डोस 5 लाख 95 हजार तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 31 हजार एवढी अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही लसीकरणाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल, नो रेशनची घोषणा करण्यात आली आहे.
इतर बातम्या-