औरंगाबादः मार्च महिन्यातच शहराचे तापमान (City Temperature) 39 ते 40 अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळे सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यातच शहरात कुठे आठ तर कुठे नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते. दरम्यान, रविवारी 20 मार्च रोजी फारोळा फाट्याजवळ शहराला पाणीपुरवठा (Aurangabad water supply) करणारी 700 मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी (Water pipe line) फुटल्याने सोमवारी शहरातील कोणत्याच भागाला पाणी मिळणार नाही, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून नागरिकांनी उद्यापर्यंत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच मंगळवारीदेखील काही भागात विस्कळीत पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
शहराला 1400 मिमी ही नवी जलवाहिनी तसेच 700 मिमी व्यासाची नवी जलवाहिनी या दोन्हींमार्फत पाण्याचा पुरवठा केला जातो. या दोन्हीही वाहिन्यांचा कार्यकाळ आता जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे हे पाइप वारंवार फुटतात. रविवारी दुपारी 2 वाजता फारोळा ते नक्षत्रवाडी दरम्यान फारोळा फाटा येथील नाल्यातील 700 मिमीची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे फारोळा येथून शहराकडे येणारे पाणी बंद करण्यात आले. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने या परिसरात पाणी साचले होते. त्याचा उपसा करण्यासाठी तीन मोटर पंप लावण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरु झाले. हे काम रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार होते. मात्र वाहिनी दुरुस्ती झाल्यानंतरही पाणीपुरवठा काही तास बंद राहणार होता. तसेच शहरातील जलकुंभात पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद तर मंगळवारी पाणी पुरवठा विस्कळीत राहिल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
उन्हाळ्यात बहुतांश बोअरवेल आटतात. त्यामुळे पडेगाव, मिसारवाडी, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, जटवाडा रोडसह अनेक भागांत मनपाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाइपलाइन फुटल्यामुळे या भागातह टँकरचे पाणी पुरवण्यास मनपाला अडचण येणार आहे.
दरम्यान, फारोळ्याजवळ फुटलेली जलवाहिनी नाल्यात होती. त्यामुळे पाइपलाइन आणि नाल्याचे पाणी बंद करण्याचे आव्हान मनपा कर्मचाऱ्यांसमोर होते. अखेर यासाठी मनपाला अग्निशमन विभागाचे पंप मागवावे लागले. 30 कर्मचारी रात्री उशीरापर्यंत पाणी उपसण्याचे काम करत होते. या दुरुस्तीला वेळ लागणार असल्यामुळे सोमवार आणि मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
इतर बातम्या-