औरंगाबादः बालमजुरी आणि बाल तस्करीविरोधात लढा देणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी हे आज औरंगाबादकरांशी संवाद साधणार आहे. शहरात औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या (Aurangabad Management Association) वतीने रेअर-शेअर (Rare share) कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा या कार्यक्रमाचे 70 वे सत्र आहे. या निमित्त बाल तस्करीविरोधात लढा देणारे नोबेल शांतता (Nobel Peace prize) पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी हे प्रमुख वक्ते असतील. आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तएएमआयचे अध्यक्ष सतीश कागलीवाल यांनी सीएमआयएमच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः तरुणांनी सत्यार्थी यांचे अनुभव ऐकण्यासाठी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मूळ मध्यप्रदेशातील विदिशा येथील कैलाश सत्यार्थी यांनी बालमजुरीची मानवाधिकारांशी सांगड घालून बालकांच्या शोषणाविरोधात जागतिक स्तरावर आवाज उठवला. वयाच्या 26 व्या वर्षी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे करिअर सोडून बालहक्कांची सनद मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. 1980 मध्ये बचपन बचाओ चळवळ उभी करून त्यांनी जगातील 144 देशांतील 83000 पेक्षा जास्त मुलांना त्यांचा हक्क मिळवून दिला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 2014 चा नोबेल शांतता पुरस्कार या सर्वांवर शीखर ठरला. पाकिस्तानी शिक्षण पुरस्कर्ती मलाला युसुफजई हिच्यासोबत सत्यार्थी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
एएमए ही संस्था 1977 साली काही उद्योजक आणि व्यवस्य़ापनातील व्यावसायिकांनी येऊन स्थापन केली. व्यवस्थापन क्षेत्रातील ट्रेंडबद्दल कल्पनांची देवाण-घेवणा व्हाव, यासाठी एएमएच्या वतीने 2012 पासून रेअर शेअर हे व्यासपीठ उपलद्ध करून देण्यात आले आहेत. यंदा रेअर-शेअरचे हे 70 वे पुष्प असून कैलाश सत्यार्थी यावेळी औरंगाबादकरांच्या भेटीला येणार आहेत. भारतात आजपर्यंत एक लाखाहून अधिक मुलांची त्यांनी सुटका केली आहे. त्यांचा हा प्रवास ते औरंगाबादकरांसमोर उलगडून दाखवतील. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कागलीवाल, सी.पी. त्रिपाठ, सुनील देशपांडे, आशिष गर्दे यांनी केले आहे.
इतर बातम्या-