औरंगाबादः पैठण नगर पालिकेच्या (Paithan Nagarpalika) आरक्षण सोडत कार्यक्रमात आज मोठा गदारोळ झाला. ओबीसींना (OBC) वगळून आरक्षण सोडत जाहीर केल्यामुळे भाजप सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करून गोंधळ घातला. राज्यातील 216 नगरपालिकांमधील प्रभागांनुसार आरक्षण सोडत आज जाहीर होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) चार नगरपालिकांमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. या अनुशंगाने पैठणच्या पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत जाहीर केली जात होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात गदारोळ केला. इतिहासात पहिल्यांदाच ओबीसींना वगळून आरक्षण सोडत जाहीर झाली असून ओबीसी उमेदवारांवर हा अन्याय असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सभेवर बहिष्कार टाकला.
पैठण नगर पालिकेची आरक्षण सोडत आज पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही सोडत जाहीर केल्यानंतर सूरज लोळगे यांनी माईक हातात घेऊन आरक्षणाविषयीची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मात्र सभागृहातील लोकांच्या आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, ओबीसी आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असतो. मात्र इतिहासात पहिलीच वेळ आहे. ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवाराला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे ही पूर्ण आरक्षणाची प्रक्रिया फोल ठरली आहे. मी आणि भाजप आरक्षण प्रक्रियेवर बहिष्कार टाकतो…. असं वक्तव्य लोळगे यांनी केलं. त्यानंतर सभागृहातील भाजप कार्यकर्ते ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाचं बापाचं… अशी घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर गेले.
ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टासमोर सादर करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असा निर्णय दिला. यामुळे भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जातात. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा गोळा घोटल्याची टीका भाजपकडून केली जाते. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडत आहे. औरंगाबादमध्ये पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि कन्नड येथील नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज होत आहे. यावेळी पैठण येथील भाजप सदस्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊच नयेत, अशी मागणी केली.