औरंगाबादः औरंगाबादमध्ये आज क्रांती चौक पेट्रोल पंपावर सकाळपासूनच पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल संपण्याची अफवा नव्हती की औरंगाबाद बंदची बातमी नाही… यापेक्षाही वेगळंच कारण होतं. आज 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसाचं. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद मनसेच्या (Aurangabad MNS) वतीनं शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावर चक्क 54 रुपये प्रतिलीटर दराने पेट्रोल मिळणार, अशी सवलत देण्यात आली होती. आज मंगळवारी केवळ एकच दिवस, एकच तास ही संधी मिळणार असल्याचं मनसेनं सोमवारी संध्याकाळी जाहीर केलं. त्यानुसार सकाळी 8 ते 9 या वेळात क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर ही सुविधा देण्यात येणार होती. मात्र सकाळी आठ वाजेपासूनच क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफ्फान गर्दी झाली. असंख्या औरंगाबादकरांनी या संधीचा लाभ घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त एकच तासासाठी 54 रुपये लीटर पेट्रोलची सुविधा देण्यात आली होती. मात्र या संधीचा लाभ घेण्यासाठी औरंगाबादकरांनी एवढी गर्दी केली की एक तास कधी उलटून गेला समजलंच नाही. पण नागरिकांच्या रांगा मात्र हटत नव्हत्या. अखेर मनसेचे शहराध्य सुमित खांबेकर यांनी एका तासाऐवजी आणखी काही काळ ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आठ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम पावणे अकरापर्यंत चालला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या संधीचा फायदा शेकडो औरंगाबादकरांनी घेतला.
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज मनसेच्या वतीनं एका तासासाठी पेट्रोल 54 रुपये लीटर असे दिले असले तरीही औरंगाबादेत या संधीचा फायदा न घेणाऱ्यांसाठी पेट्रोलचे भाव नेहमीप्रमाणेच आहेत. आज औरंगाबादमध्ये 108 रुपये लीटर असे आहे. म्हणजेच मनसेच्या वतीनं निम्म्या किंमतीत पेट्रोलची सुविधा दिली. या संधीचा लाभ घेणाऱ्या औरंगाबादकरांनी आनंद व्यक्त केला आणि राज ठाकरेंना मनापासून शुभेच्छाही दिल्या.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेट्रोल 54 रुपये लीटर दराने उपलब्ध करून दिलं. शहरातील सागर पार्क मैदानाजवळ असलेल्या चौबे पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेदरम्यान हा उपक्रम राबवण्यात आला. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, नागरिकांना काहीसा दिलासा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हजारो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सोलापुरच्या एका चाहत्याची चांगलीच चर्चा आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनिंब इथं राहणारा तरुण राज ठाकरेंवर जीवापाड प्रेम करतो. राज ठाकरे हृदयातच रहावेत, यासाठी त्यानंतर राज ठाकरेंचा टॅटूच छातीवर गोंदवून घेतला आहे. या तरुणाचं नाव आहे, विशाल भांगे. राज ठाकरेंचे चाहते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसरलेले आहेत. पण अशा प्रकारे छातीवर टॅटू करून घेणारा हा पहिलाच अवलिया असावा. या तरुणाचं राज ठाकरेंवरील प्रेम पाहून मनसे नेते बाळा नांदगावकरांनी त्याचं कौतुक केलं.