रंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा (Crime filed) दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ही मोठी कारवाई केली . सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. यासंबंधीचं अधिकृत एफआयआर अद्याप हाती आलेलं नाही. मात्र पोलिसांच्या अटी किंवा नियमांचं पालन झालं नाही तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही दिला होता. रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं, कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. आज अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत जी भाषा वापरली त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. राज ठाकरे यांची सभा रविवारी रात्री साडे नऊ वाजता संपली. दहा वाजताच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करायला पाहिजे होता. पण पोलीस आणि सरकार गप्प का आहे, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. उद्धव ठाकरे सरकार आपल्या भावाला पाठिशी घालत आहे का, असाही प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच मैदानावर त्यापेक्षा जास्त गर्दी गोळा करून आणखी चांगली भाषा वापरून मी भाषण करेन, मग तेव्हाही माझ्यावर कारवाई करू नका, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता.
दरम्यान, सांगलीतील शिराळा कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढले होते. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप त्यावर काही कारवाई केली नव्हती. 28 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आललं यासंबंधीचं पत्र आज समोर आलं असून 2008 सालच्या एका प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे कोर्टासमोर चौकशीसाठी हजर राहतील का, असा प्रश्न आहे.