औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा अंदाज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या मेळाव्यालाच (MNS Rally) 300 रुपये देऊन लोक आणले होते, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. येत्या 01 मे रोजी मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला एक लाखाहून अधिक लोक जमतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. आतापासूनच मराठवाड्यातील विविध संघटनांचे लोक मनसेच्या संपर्कात असून ते सभेला येण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे दावे फोल असल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील, असा अंदाज चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. ही सभा औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. शिवसेनेच्या अनेक ऐतिहासिक सभा येथे गाजल्या आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे. पण मनसेच्या मागील मेळाव्यातही 300 रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एवढंच नाही तर मीडियाने राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या वेळी लोकांना विचारले तर लोकच सांगतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे.
येत्या 03 मे पर्यंत राज्यातील मिशिदींवरचे भोंगे हटवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच येत्या 03 मे रोजी रमजान ईददेखील आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरेंची सभा 03 तारखेनंतर घ्यावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच सभेचे ठिकाण मराठवाडा सांस्कृतिक मंडळाऐवजी गरवारे स्टेडियमवर घेण्यात यावे, असा पर्यायही पोलिसांनी दिला आहे. मात्र मनसे 01 मे रोजीची तारीख आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान या दोन्ही गोष्टींवर ठाम आहे.
इतर बातम्या-