औरंगाबादः येत्या महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेचे (Aurangabad MNS) पदाधिकारी कामाला लागले आहेत. याठिकाणी तब्बल एक लाख लोक जमतील, अशी अपेक्षा मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा गरवारे स्टेडियमवर (Garware Stedium) घेता येईल का, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील इतरही मैदानांचा पर्याय तपासून पाहिला जात आहे, अशी माहिती हाती येत आहे. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जाहीर केल्याप्रमाणे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल, अशी आग्रही भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबादमधील गाजलेली सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्यात आली होती. तेथेच आगामी 01 मे रोजीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा घेण्याची घोषणा राज ठाकरे यांनी देली आहे. हिंदुत्वाची आग्रही भूमिका मांडण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली जागा नाही, अशी मनसेची भूमिका आहे. त्यामुळे पोलीस इतर ठिकाणी सभेसाठी पर्यायांची चाचपणी करत असले तरीही राज ठाकरेंची सभा याच मैदानावर होणार, यासाठी आग्रही असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली.
दरम्यान, येत्या 03 मे पर्यंत राज्यातील सर्व मशीदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कालच औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी नवे आदेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शहरात कुठेही अनधिकृत भोंगे लावले जाणार नाहीत. ज्या ठिकाणी भोंगे लावण्यात आले आहेत, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात रितसर अर्ज करून ते अधिकृत करून घ्यावेत, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. त्यानंतर शहरातील अनधिकृत भोंग्यांवर पोलीस कारवाई करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंची सभा आणि औरंगाबादमधील संवेदनशील वातावरण पाहता, सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर आहे. प्रक्षोभक संदेश निर्माण करणे किंवा ते फॉरवर्ड करणे हा गुन्हा असून अशी कृती आढळल्यास औरंगाबाद सायबर पोलिसांकडून सदर व्यक्तीविरोधात कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
इतर बातम्या-