दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजपात येण्यासाठी माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. पण देशाच्या विकासासाठी शरद पवार योग्य निर्णय घेतील, असं भागवत कराड म्हणालेत. एकिकडे शिंदे गटातील आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार असतानाच अजित पवार भाजपशी सलगी करण्याच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत कराड यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतं.
नागपूरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेवरून डॉ. कराड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ तीन विचाराचे पक्ष एकत्र येऊन वज्रमुठ सभा घेत आहेत. हे सत्तेसाठी एकत्र येत आहेत पण यांचे विचार एक नाहीत. हे फिजिकली सोबत असले तरी मेंटली हे लोक एकत्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभा यशस्वी होणार नाहीत. फक्त अजित पावरच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात अस्वस्थता आहे. विचार एक नसल्यामुळे ही अस्वस्थता आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही.
शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण देशाच्या विकासासाठी शरद पवार योग्य निर्णय घेतील.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सध्या शिंदे-भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. यावरून डॉ. भागवत कराड यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांना ते लहान होते तेव्हापासून मी ओळखतो. त्यांच्या शिवसेनेतले त्यांच्या मागे किती बोलतात हे मला माहिती आहे. त्यांच्या मागे शिवसेना किती आहे याचीही मला कल्पना आहे, असं खोचक वक्तव्य त्यांनी केलंय.
भाजपने शिवसेना जशी फोडली तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आहे. या दबावामुळे ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार यांनी भेटीत सांगितल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केलाय.