औरंगाबादः शहरातील कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या संत एकनाथ रंगमंदिर (Sant Eknath Rangmandir) आणि संत तुकाराम नाट्यगृहांची अवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली होती. त्यापैकी संत एकनाथ रंगमंदिराचे महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) वतीने नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारी रोजी या नव्या नाट्यगृहात पहिला प्रयोगही आयोजित करण्यात आला. आता सिडको (CIDCO) येथील संत तुकाराम नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने बुधवारी निविदा प्रसिद्ध केली. नाट्यगृहातील आसनव्यवस्था, ध्वनी व प्रकाश व्यवस्था आदी सर्वच कामे स्मार्ट सिटी मार्फत केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच याही नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
संत तुकाराम नाट्यगृहातील कामांवर जवळपास सात कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीने 5 कोटींचे साधारण अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर अनेक कामे वाढत गेली आणि हे बजेट सात कोटींवर पोहोचले. गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने शहरातील संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृह ही दोन्ही बंद होती. 3 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 25 जानेवारी रोजी संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण करण्यात आले. आता संत तुकाराम नाट्यगृहाकडे स्मार्ट सिटीने लक्ष वळवले आहे. केंद्र शासनाने देशभरातील स्मार्ट सिटींना 31 मार्च 2022 नंतर कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या स्मार्ट सिटीमार्फत विविध कामांच्या मोठ्या प्रमाणावर निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचीही निविदा प्रसिद्ध झाली आहे.
संत तुकाराम नाट्यगृहातील खुर्च्या, स्टेज, प्रकाश, विद्युत आणि ध्वनीव्यवस्था सगळेच नव्याने करण्यात येणार आहे. रंगरंगोटी, काही बांधकाम या कामांचाही त्यात समावेश आहे. या सगळ्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. तसेच हे सर्व काम पुढील 6 ते 8 महिन्यांत पूर्ण होईल, या दृष्टीने पुढील प्रक्रिया केली जाईल, असे स्मार्ट सिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
इतर बातम्या-