औरंगाबाद| आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता विविध पक्षांनी ग्रामीण भागात मोर्चेबांधणीवर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष विस्ताराला गती दिल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत त्यांच्या पक्षातील मातब्बर नेते राष्ट्रवादीत आणले. गंगापूर काँग्रेससासाठी हा मोठा धक्का आहे. गंगापूर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासह आणखी काँग्रेसी सहाकाऱ्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा स्वागत सोहळा पार पडला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सलग 15 वर्षे भूषवलेले संजय जाधव यांनी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पर्वेश केला. संजय जाधव यांनी गंगापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापतीदेखील होते. संजय जाधव यांच्यासोबत पुढील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
– गंगापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सुरेश नेमाडे
– नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे
– योगेश पाटील
– माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अशोक खाजेकर
– नगरसेवक मोहसीन चाऊस
– माजी नगरसेवक सचिन भवार
– हासिफ बागवान
– गंगापूर बाजार समितीचे सहा माजी संचालक
– पंचायत समितीचे माजी सदस्य शारंगधर जाधव
– गंगापूर युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश बारहाते यांच्यासह संजय जाधव यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबईत संजय जाधव यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करताना अजित पवार यांनी मराठवाड्यातील नेत्यांवर काय काय जबाबदारी आहे, याविषयी वक्तव्य केले. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर, खुलताबादचा विकास होईल, असे ते म्हणाले. तसेच परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. अजूनही अनेकजण राष्ट्रवादी येण्याच इच्छुक आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. लवकरच त्यांचेही प्रवेश होतील, असे अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या-