औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यामुळे औरंगाबादधील शाळाही उद्यापासून म्हणजेच 6 जानेवारीपासून बंद ठेवण्याचा मोठा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उद्यापासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.
4 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. या दिवशी जिल्हाभरात 104 रुग्णसंख्या नोंदली गेली. त्या आधी संपूर्ण आठवड्यातील रुग्णसंख्येत हळू हळू वाढ दिसून येत होती. मात्र रुग्णांनी पन्नाशी पार केलेली नव्हती. 4 जानेवारी रोजी अचानक रुग्णांनी शंभरी पार केल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शंका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज लगेच 5 जानेवारी रोजी औरंगाबाद महापालिकेनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, दररोज 2400- 2500 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर नागरिकांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे, सतत हात धुणे या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच पात्र असूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष केले असेल तर वेळीच लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या-