औरंगाबादः आगामी शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादेत एकिकडे जोरदार तयारी सुरु आहे. शहरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला शिवरायांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) मोठ्या थाटा-माटात क्रांती चौकात उभा ठाकला आहे. लवकरच याचे अनावरण केले जाईल. मात्र मागील वर्षातील शिवजयंती उत्सवाचा एक वेगळाच वाद समोर आला आहे. महापालिकेने क्रांती चौकातील शिवजयंती उत्सावचे (Shiv Jayanti) साउंड अँड डेकोरेशनचे बिल दोन वर्षांपासून थकवले असून त्यामुळे आता संबंधित ठेकेदाराने कुटुंबासह उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेची ऐपत नसेल तर शिवभक्त म्हणून मी शिवजयंतीचे मागील बिल देण्यास तयार आहे, असे विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. आता महापालिका यावर काय कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विनोद पाटील यांनी गुरुवारी मनपाला सदर पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, शहरात दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी होते. त्यासाठी सजावट साउंड सिस्टीम आदी कार्यक्रमाचा खर्च महापालिका प्रशासन करत असते. मात्र दोन-दोन वर्षे लोकांची बिले दिली जात नाहीत. याबाबत संबंधित ठेकेदारानेच पत्र लिहून मला हकीगत कळवली आहे.
संतोष चादरे असे या ठेकेदाराचे नाव असून त्यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवजयंती निमित्त सर्व डेकोरेशन, लाइट, साउंड व्यवस्थेचे काम केले. या कामासाठी लागणाऱ्या खर्चाची कल्पना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना दिली होती. लेखी कोटेशन आधीच महापालिकेत जमा केले होते. तरीही 2 वर्षे होऊनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नाही. महापालिकेकडे वायफळ गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, पण महाराजांच्या जयंतीला अशा प्रकारे गालबोट लागत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही, मनपाने मागचे बिल तातडीने द्यावे..’ असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
विनोद पाटील यांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आगामी शिवजयंतीदेखील महानगर पालिकेने थाटात साजरी करावी. मनपाची तशी ऐपत नसेल तर स्पष्ट सांगावे. शिवभक्त म्हणून मी महापालिकेचे शिवजयंतीचे मागचे बिल देण्यास तयार आहे. आता महापालिका यावर काय कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-