औरंगाबाद | दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीनिमित्त औरंगाबादमधील शिवप्रेमींमध्ये (Aurangabad Shiv Jayanti) अपूर्व उत्साह पहायला मिळतोय मात्र याच वेळी विविध संघटनांमध्ये शिवजयंती अधिक दमदारपणे साजरी करण्याची चढाओढ पहायला मिळत आहे. यातूनच 16 फेब्रुवारीला मध्यरात्रीतून शहरात बॅनर वॉर (Banner War) सुरु झालं आहे. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी आणि सर्वच राजकीय पक्षांनी शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. मात्र औरंगाबाद महापालिकेच्या पथकाकडून मध्यरात्री शिवजयंतीलासाठी लावण्यात आलेले हे बॅनर्स काढण्यात आले. त्यामुळे मनसे (Aurangabad MNS), शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी यांनी क्रांती चौकात धाव घेतली. महापालिका आणि पोलिसांना यासंबंधीचा जाब विचारला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा शहरात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी बॅनर्स उभे केले आहेत. मनसेचे 120 बॅनर्स शहरात झळकले आहे. तसेच इतर संघटनांनीदेखील शुभेच्छा देणारे बॅनर्स सकाळ होताच लावले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील बॅनर वॉर पुढील दोन दिवस तरी असेच सुरु राहणार, असं दिसतंय.
आगामी शिवजयंतीनिमित्त शहरात विविध संघटनांच्या वतीने मोठ-मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र क्रांती चौकात लावण्यात आलेले बॅनर्स काल मध्यरात्री अचानक काढून टाकण्यात आले. त्यामुळे शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख, भाजप नेते राजू शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी क्रांती चौकात धाव घेतली. तसेच मनपाच्या या कारवाईवर जाबा विचारण्यात आला. हा वाद आणखी विकोपाला जाऊ नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी केली. काही वेळाने मनपाच्या पथकाने तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, क्रांती चौकात उभ्या असलेल्या देशातील सर्वोच्च छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता होणार आहे. पण प्रशासनाने ही रात्रीची वेळच का ठेवली, रात्रीच्या वेळी उत्सव साजरा करण्यास बंधनं येतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, रात्री 12 नंतर ढोल-ताशे व इतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. मग 12 वाजता आम्ही आमच्या राजांच्या पुतळ्याचं अनावरण कसं करणार, असा सवाल शिवप्रेमी संघटनांकडून केला जात आहे.
इतर बातम्या-