औरंगाबादः शहरातील बहुचर्चित शिवरायांचा पुतळा (Aurangabad Shivaji Maharaj Statue) अखेर क्रांती चौकातील चौथऱ्यावर विराजमान करण्यात आला. रविवारी पहाटे शिवरायांचा हा पुतळा औरंगाबादेत आला. त्यानंतर त्याची रंगरंगोटी आणि इतर थोडे काम बाकी होते. सोमवारी रात्रीच या पुतळ्याला चौथऱ्यावर चढवण्याचे काम करण्यात येणार होते. अवघी रात्र मेहनत केल्यानंतर अखेर मंगळवारी पहाटे महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर चढवण्यात यश आलं. मंगळवारी 25 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा पुतळा क्रेनच्या सहय्याने चौथऱ्यावर विराजमान झाल्याची माहिती औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.
देशातील सर्वात उंच असा शिवरायांचा पुतळा असून त्याची उंची 21 फूट आहे. तर त्यासाठी क्रांती चौकात बनवण्यात आलेल्या नव्या पुतळ्याची उंची 31 फूट एवढी आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च आला आहे. तर नव्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला आहे. पुतळ्याचे एकूण वजन 10 टन एवढे झाले आहे. पुतळा चौथऱ्यावर चढवण्यासाठी आधी 8 टन वजन क्षमतेचे क्रेन आणले होते. सोमवारी रात्री त्याद्वारे पुतळा चढवण्याचे काम सुरु झाले. मात्र तो अपुरा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे ऐनवेळी 12 टन वजन क्षमतेचा क्रेन मागवण्यात आला आणि पुतळा अखेर विराजमान करण्यात आला.
शिवरायांचा अश्वारुढ पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला आहे. आता त्यावर आवरण टाकून झाकून ठेवण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारीत शिवरायांच्या या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शुभमुहूर्तावर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण कार्यक्रम व्हावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने पत्राद्वारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतीक्षा जिल्ह्यातील शिवप्रेमींना होती. रविवारी उशिरा रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाल्यानंतर औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी पहाटे विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून यासाठी विविध ठिकाणी शिवप्रेमींची तयारी सुरु झाली आहे. एसटी कॉलनी येथील ज्ञानेश विद्या मंदिर येथे शिवकुंज फाउंडेशन प्रणित रणझुंजार ढोलपथकाचे वाद्यपूजन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. शिवकाळापासून पारंपारिक वाद्यांचे एक वेगळे महत्व आहे. या वाद्यामुळे आपली मराठमोळी संस्कृती अभिव्यक्त होते. आजच्या बदलत्या काळामध्ये वाद्य जरी बदलले असले तरी पारंपारिक असलेले ढोल, ताशे, झांज, लेझीम याचे महत्व कधीच कमी झाले नाही. शिवकालीन वाद्यांची संस्कृती आजच्या तरुण पिढीने जोपासावी आणि ही परंपरा कायम पुढे सुरु ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी वाद्य पथकातील तरुण-तरुणींना केले.
इतर बातम्या-