औरंगाबादः हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणासाठी मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दाम्पत्याला औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी चांगलंच सुनावलं आहे. राणा दाम्पत्य हे फक्त राजकारण करत आहे. त्यांना हनुमान चालीसा तरी पाठ आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच मातोश्रीवर (Matoshree) जाण्याची तयारी राणा दाम्पत्य करीत असले तरीही आमचे शिवसैनिक त्यांना तेथे पायही ठेवू देणार नाहीत, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. औरंगाबादमधील ज्येष्ठ शिवसेना नेते आणि मातोश्री तसेच उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय अशी चंद्रकांत खैरे यांची ख्याती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना चांगलेच खडसावले आहे.
राणा दाम्पत्यानं आखलेलं हे षडयंत्र असून आमचे शिवसैनिक त्यांना मातोश्रीकडे फिरकूही देणार नाहीत, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं. तसेच राणा दाम्पत्याला जो मदत करतोय, तो अत्यंत तुच्छ व हलक्या दर्जाचं राजकारण करत आहे, अशी टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर उद्या सकाळी नऊ वाजता हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांची मोठी गर्दी दिसून आली. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर साडे चार वाजता मुख्यमंत्री स्वतः मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांचे हात जोडून आणि हात उंचावून आभार मानले. आता उद्या राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाच्या इशाऱ्याचे काय होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादमध्ये येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जवळपास एक लाख लोक जमतील अशी अपेक्षा मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मनसेच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतात, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. विश्वास बसत नसेल तर माध्यमांनी थेट सभेत आलेल्या लोकांना विचारून पहावे, असा दावाही त्यांनी केला आहे.
इतर बातम्या-