औरंगाबादः औरंगाबादमध्ये आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या आमदार तथा मंत्र्यांच्या समर्थनार्थ मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या कार्यकर्यांनी तर पैठणमध्ये संदिपान भूमरेंच्या (Sandipan Bhumre) समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. शिंदेसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी शिवसेना समर्थकांकडून केली जात आहे. सिल्लोड आणि पैठणमध्ये दोन्ही ठिकाणी आज सकाळपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. आम्ही सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहोत आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठीच आयुष्यभर काम करणार, अशी प्रतिक्रिया येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आज मोठी रॅली काढली.
सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. सत्तारांच्या शिवसेना कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपासून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ढोल ताशा वाजवत सत्तार समर्थकांचा जल्लोष सुरू केलाय. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
तर पैठणमध्ये रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांच्यासाठी शेकडो कार्यकर्ते एकवटले. पैठण येथील छत्रपती शिवाजी चौकात बंडखोर आमदार संदीपान घुमरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आम्ही एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांचे समर्थक असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी आधी महाराष्ट्रात येऊन आमच्यासमोर उघडपणे बोलावं. हिंमत असेल तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचया नावाशिवाय निवडणुका लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेनं दिलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
आज रविवार सुटीचा दिवस असला तरीही महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडाडमोडी सुरु आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज मिळाला असून ते राजभवनात पोहोचले आहेत. महाविकास आघाडीतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवरील कारवाईसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आज घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट आज नवा गट स्थापनेसंदर्भातील पत्र राज्यपालांकडे पाठवू शकतो. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्येही महत्वपूर्ण बैठक झाली. अशोक चव्हाणांनी आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर त्यांची भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.