औरंगाबादः मराठवाड्यातील नामवंत लेखक आणि प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर (Dr. Suhas Jewalikar) यांचे नुकतेच निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Mediacal Collage) भूलतज्ज्ञ विभागाचे ते प्रमुख होते. शविवारी रात्री उशीरा दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. अनेक काव्यमैफली, विद्रोही साहित्य संमेलनं आणि साहित्यिक (Marathi Literature) कार्यक्रमांमध्ये जेवळीकर यांनी आपली अनोखी छाप सोडली होती. समाजातील अनेक विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवत मार्मिक भाष्य करण्याची त्यांची शैली होती. त्यांनी लिलिहेल्या कविता आणि वर्तमानपत्रांतील स्तंभांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या निधनानंतर साहित्यविश्वातील एक दिलदार माणूस हरवला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अत्यंत साधी विचारसरणी असलेल्या डॉ. जेवळीकर यांनी नेहमीच साध्या विचारांचं सोनं लुटलं. त्यामुळे रविवारी त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कारही याच पद्धतीने करण्यात आले. ना हारतुऱ्यांच्या माळा, ना कोणता विधी, अगदी साधेपणाने त्यांना निरोप देण्यात आला. डॉ. सुहास यांनी नेहमीच आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले. हे करताना त्यांनी कधीही समाजाचे दडपण घेतले नाही. त्यामुळे त्यांना निरोप देताना कोणताही विधी होणार नाही, अशी भूमिका डॉ. जेवळीकर यांच्या पत्नी संध्या यांनी घेतली.
डॉ. जेवळीकर हे मराठीतील ख्यातकीर्त लेखक होते. ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा वाड्मयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार आदी सन्मानांनी गौरवण्यात आलेलं आहे.
डॉ. सुहास जेवळीकर यांच्या निरोप समारंभासाठी प्रा. डॉ. जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, मंगल खिवंसरा, सुधीर महाजन, डॉ. सुहास रोपळेकर, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. जयश्री सोनवणे, डॉ. अविनाश येळीकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. मेघा जोगदंड, कौतिकराव ठाले पाटील, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
इतर बातम्या-