औरंगाबाद | उंच डोंगरावरून एकाच पाषाणात कोरलेली लेणी किंवा शिल्प हे वेरुळ येथील कैलास लेणीचं (Ellora Caves) वैशिष्ट्य. जगात अशी फक्त तीनच शिल्प आहेत. आफ्रिका, भारतातील तमिळनाडू आणि महाराष्ट्रात औरंगाबादमधील वेरुळ येथील ही लेणी. यामुळेच तर जगभरातील पर्यटक (Tourists) आणि अभ्यासकांना ही लेणी भुरळ घालते. औरंगाबादकर आणि पर्यटकांनी दिवसाच्या उजेडात या लेणीचं सौंदर्य डोळ्यात अनेकदा साठवलं असेल, मात्र रात्रीच्या मंद प्रकाशात कैलास लेणीतली शिल्प पाहण्याची संधी नुकतीच औरंगाबादकरांना मिळाली. निमित्त होतं जागतिक वारसा दिनाचं (World Heritage Day). पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने नुकताच या ठिकाणी एक महोत्सव घेण्यात आला. यावेळी कैलास लेणी परिसरात 300 प्रकाशझोत लावण्यात आले होते.
आधी कळस मग पाया या तत्त्वानुसार एकसंध पाषाणात वरून खालपर्यंत कोरण्यात आलेल्या या शिल्पाची अवघ्या जगाला भुरळ पडलेली आहे. युनेस्कोने जारी केलेल्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरुळचं नाव पहिल्या पाचात येतं.
दक्षिण आणि उत्तरेकडील वास्तु स्थापत्य शैलीचा हा उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूला दोन हत्ती आणि ध्वजस्तंभ कोरलेले आहेत.
असं म्हणतात की, कैलास लेणी कोरताना यातून 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या परिसरात कुठेही हे दगड दिसत नाही. या दगडांचा वापर आजूबाजूची मंदिरं बांधण्यासाठी केला असावा, असा अंदाज इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.
कैलास लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे, त्यात वरील बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपातही सुंदर कोरीव काम असून स्तंभही आहेत. मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूला भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.
इतर बातम्या-