औरंगाबादः पर्यटनाची (Aurangabad Tourism) राजधानी म्हणून नावाजलेल्या औरंगाबादमध्ये अनेक जगप्रसिद्ध मंदिरं, शिल्प आणि इतिहासाचा (Historical Aurangabad) वारसा सांगणाऱ्या वास्तु आहेत. या स्थळांची पर्यटकांना ओळख व्हावी, या दृष्टीने आता नव्या गाइड्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या वतीने मार्चच्या पहिल्या आठवड्यात नव्या गाइड्सना प्रशिक्षण दिले जाईल. ग्वाल्हेरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड मॅनेजमेंटचे (Indian institute of tourism) अनुभव प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यात दोन मुलींसह 50 जणांचा समावेश आहे. या प्रशिक्षणसाठी 194 जणांनी अर्ज केला होता. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून 50 जणांची निवड करण्यात आली आहे. आता या निवडक तरुणांना पर्यटन स्थळांविषयी लोकांना कशी माहिती द्यायची, आपल्या वास्तुंचा इतिहास कशा प्रकारे सांगायचा, आदी प्रशिक्षण दिले जाईल.
मार्च महिव्याच्या पहिल्या आठवड्यात हे गाइड्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती पर्यटन संचलनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांनी दिली. ते म्हणाले, औरंगाबादमधील पर्यटन स्थळांची ओळख पर्यटकांना अधिक चांगल्या प्रकारे करुन देण्याच्या दृष्टीने नव्या गाइड्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी आधी पाच दिवस पर्यटन संचलनालयात तर एक दिवस प्रत्यक्ष पर्यटन साइटवर जाऊन प्रशिक्षण दिले जाईल. यात पर्यटकांशी कसे बोलावे, जागेची माहिती कशी द्यावी, या ठिकाणच्या सुंदर आठवणी त्यांच्या संग्रही राहाव्यात या दृष्टीने काय प्रयत्न करावेत, असे अनेक बारकावे शिकवण्यात येणार आहे.
मागील दोन- अडीच वर्षात कोरोना महामारीमुळे औरंगाबादमधील पर्यटन व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला. मात्र आता पर्यटन वृद्धीसाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गतच हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षकांसाठी पैसा कमावणे हा मूळ उद्देश नसून येथील स्थळांची माहिती अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा या मागील उद्देश आहे. या प्रशिक्षणार्थींमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे. सहा दिवसांचे प्रशिक्षण झाल्यानंतर या नव्याने ट्रेनिंग झालेल्या गाइड्सना ओळखपत्र दिले जाईल. पर्यटकांनी त्यांच्यासोबत सहल केली तर अधिक अचूक माहिती मिळेल.
या प्रशिक्षणात स्थानिक तरुणांना प्राधान्य दिल्याची माहिती डॉ. हारकर यांनी दिली. कारण जे औरंगाबादमध्ये आधीपासून राहिले आहेत, त्यांना येथील परिसराची बारकाईने माहिती असते. तसेच आपले इतर काम सांभाळूनही त्यांना औरंगाबादमधील पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी जाता येईल. 10, 12 वी उत्तीर्ण तरुणांनाही या प्रशिक्षणार्थींमध्ये संधी देण्यात आली आहे. यासाठी वयाची मर्यादा 18 ते 40 अशी ठरवण्यात आली आहे.
इतर बातम्या-