औरंगाबादः समाजाचा तृतीय पंथीय व्यक्तींकडे (Transgenders) बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. अशा व्यक्तींचा समाजातील मुख्य प्रवाहात आणायला हवे, हा उद्देश ठेवत औरंगाबाद स्मार्ट सिटी (Aurangabad smart city) प्रशासनाने मागील काही दिवसांपासून काही उपक्रम हाती घेतले आहेत. याच प्रक्रियेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या जनजागृतीसाठी (Corona Vaccination) तृतीय पंथीयांची नेमणूक केली जाईल, असा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. यासाठी औरंगाबाद शहरातील पदवीधर असलेल्या 10 तृतीयपंथियांची नियुक्ती सर्वप्रथम केली जात आहे. प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम राबवला जात असून या व्यक्तींची नियुक्ती करतानाही स्मार्ट सिटीला काही अडचणींना सामोरे जावे लागले.
शहरातील तृतीय पंथियांना स्मार्ट सिटीत नियुक्त करण्यात येणार असल्याचे संकेत मागील वर्षीच देण्यात आले होते. मात्र त्यांची निवड करताना प्रशासनासमोर अनेक अडचणी आल्या. मे 2021 पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस होता. या प्रक्रियेत शहरातील पुरेशी शैक्षणिक पात्रता असलेल्या तृतीय पंथीयांचा शोध घेण्यात आला. 500 पेक्षा जास्त तृतीयपंथियांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी त्यांच्या संघटनांशी संपर्क करण्यात आला. त्यातून दहा जण पदवीधारक असल्याचे समोर आले आहे. पहिल्या टप्प्यात ठराविक व्यक्तींचीच निवड केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ठराविक जणांची नियुक्ती स्मार्ट सिटीतर्फे केली जाणार आहे. लवकरच ही फाईल सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या बस सेवेसाठी तृतीयपंथियांची निवड केली जाणार होती. मात्र सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
इतर बातम्या-