औरंगाबादः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेसाठी विक्रमी गर्दी जमणार असल्याचा दावा केला जातोय. यासाठी आज सकाळपासूनच शहरात राज्याच्या विविध भागांतून वाहनं भरून लोक येत आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेत लाखो लोक येतील, असा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. मात्र औरंगाबादेत यानिमित्त होणारी गर्दी आणि राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता औरंगाबाद पोलीस (Aurangabad police) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेत स्टेजवर बसणाऱ्यांना कोरोना टेस्ट (Corona Test) अनिवार्य करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वगळता इतर सर्वांना ही तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. औरंगाबाद पोलिसांनी आमदार अंबादास दानवे यांना या आशयाचं पत्र पाठवलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेत मंचावर बसणाऱ्यांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. या सभेत प्रत्यक्ष मंचावर शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असतील. अशा एकूण 59 जणांना कोरोना तपासणी करावी लागणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे आदींचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. या सर्वांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली तरच त्यांना उद्धव ठाकरेंच्या सभेतील मंचावर हजेरी लावता येणार आहे.
औरंगाबादमध्ये काल मंगळवारी कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र त्याआधी आढळलेल्या रुग्णांसह सध्या जिल्हाभरात 13 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाची चौथी लाट टाळण्यासाठी सर्वांनी मास्क वापरावे आणि कोरोनाचे निर्बंध पाळावेत अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच उद्धव ठाकरे औरंगाबादेत येत असून त्यांची आजची सभा ऐतिहासिक होणार असल्याचा दावा शिवसेना नेते वरुण देसाई यांनी केला आहे. मुंबईतली उद्धव ठाकरे यांची सभा ज्या प्रमाणे रेकॉर्डब्रेक झाली, तशीच आजची सभाही होईल, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय भरणार, या विचाराने विरोधकांना धडकी भरलीय त्यामुळे विरोधी पक्षांनी आधीच इतर माध्यमांतून बोलायला सुरुवात केलीय, असा आरोप त्यांनी केला. ज्या ज्या वेळी शिवसेनेनं औरंगाबादच्या मैदानावर सभा घेतली, त्यावेळी मोठा बदल घडला आहे, असा दावा वरुण देसाई यांनी केला. या सभेसाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून नागरिक येतील, असंही ते म्हणाले. तर शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनीही केवळ पैठण येथूनच 25 हजार लोक औरंगाबादेत दाखल झाल्याची माहिती दिली आहे.