भावजयीला मारहाण करणाऱ्या आ. बोरनारेंना पाठिशी घालताय, चित्रा वाघ यांचे औरंगाबादेत पोलिसांवर आरोप

| Updated on: Feb 24, 2022 | 10:16 AM

आमदार रमेश बोरनारे आणि त्यांच्या साथीदाराविरोधात पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी जामीनपात्र कलमाखाली कारवाई केल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.

भावजयीला मारहाण करणाऱ्या आ. बोरनारेंना पाठिशी घालताय, चित्रा वाघ यांचे औरंगाबादेत पोलिसांवर आरोप
Follow us on

औरंगाबादः भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत चुलत भावजयीला मारहाण करणारे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना राजकीय दबावाखाली पाठिशी घातलं जातंय, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. काल त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur Shiv Sena) उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेतली. आमदार रमेश बोरनारे आणि त्यांच्या साथीदाराविरोधात पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी जामीनपात्र कलमाखाली कारवाई केल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या पीडित महिलेशी मोबाइलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे तपास अधिकारी कैलास प्रजापती यांनी सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण?

18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील कार्यक्रमात आमदार बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनारे उपस्थित होत्या. तुम्ही भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आमदार बोरनारे यांनी खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादीवरच अॅट्रॉसिटीचा गुन्ना नोंदवण्यास भाग पाडले, असाही आरोप केला जात आहे. दरम्यान, भाजपने वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली. चित्रा वाघ यांनी या प्रकरणी वैजापूर पोलीसांची भेट घेतली.

पोलीस तपास संशयास्पद- चित्रा वाघ

या प्रकरणी वैजापूरचे पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. पीडितेला चार भिंतीच्या आता मारहाण केली नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी तिला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली, त्यामुळे हा कुटुंब कलह म्हणता येणार नाही, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तसंच पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजपूत यांचे कॉल डिटेल्स तपासा, अशी मागणी त्यांनी केली.
वैजापूर पोलीस ठाण्यात हा सर्व प्रकार घडत असताना, आमदार बोरनारे मात्र जिल्हा परिषदेत वैजापूरला किती निधी मिळाला, काय कामे बाकी आहेत, याचा आढावा घेत होते.

इतर बातम्या-

Russia Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती आणखी वाढली!

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?