औरंगाबादः शहरातील वाळूज परिसरात भीषण अपघातात (Terrible Accident) एका ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद ते नगर रोडवरील (Aurangabad- Nagar) कायगाव जवळ ही घटना घडली. मालवाहतूक करणारे चारचाकी वाहन आणि बलेनो कार यांच्यात हा भयंकर अपघात झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेचं दृश्य अत्यंत विदारक होती. माल वाहतूक करणाऱ्या पिकअपला कार पाठिमागून धडकली. यामुळे पिकअप वाहनातील लोखंडी सळ्या आणि अँगल कारमधील ठेकेदाराच्या कारच्या आरपार घुसल्या. या अपघात ठेकेदाराला गंभीर जखम झाली. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू (Accident Death) झाला.
या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, वाळूज येथील अविनाथ कॉलनीत राहणारे किशोर नानासाहेब कळसकर हे वाळूज एमआयडीसी आणि परिसरातील उद्योगांना कामगार पुरवण्याचे काम करत होते. बुधवारी रात्री कळसकर हे बलेनो कारमधून औरंगबाद-नगर रोडने जात होते. त्याचवेळी पिकअपच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कळसकर यांची कार थेट पिकअपला पाठिमागून धडकली. कार पिकअपमध्ये घुसल्यामुळे या मालवाहू वाहनातील लोखंडी सळ्या आणि अँगल कळसकर यांच्या कारच्या आरपार घुसल्या. यात किशोर कळसकर हे गंभीर जखमी झाले. बजाज नगर येथील खसागी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र जखम अधिक गंभीर असल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अन्य एका अपघाताच्या घटनेत चार वर्षीय मुलगी ठार झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये बुधवारी सभा झाली. या सभेला आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीचा तोल जाऊन त्यांची चार वर्षीय चिमुकली लांब फेकली गेली. क्रांती चौकातून विमानतळाच्या दिशेने एक कार जात होती. एपीआय कॉर्नर येथे मोपेड दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला कारने उडवले. यात त्यांची मुलगी लांब फेकली गेली आणि भरधाव वेगाने आलेल्या कारचं एक चाक तिच्या अंगावरून गेलं. स्थानिकांनी धाव घेत तिला सेव्हन हिल्स येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, ज्या कारमुळे हा अपघात झाला, ती उस्मानाबाद येथील शिवसैनिकांची होती, असं सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सदर घटनेत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.