औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून तापलेला औरंगाबादचा पाणी प्रश्न (Aurangabad water problem) राज्य सरकारनेही गांभीर्यानं घेतल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शहरातील विस्कळीत आणि विलंबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित केली आहे. आज गुरुवारी 12 वाजता मुंबईत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला पाणीपुरवठा योजनेतील अधिकारी, पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित असतील. तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे या बैठकीला ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावतील. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी या बैठकीत समन्वय समिती स्थापन केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पाणी समस्येवर इतर कोणते निर्णय बैठकीत घेतले जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात पाणी समस्येवरून औरंगाबादचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औंरंगाबादेत आकारली जाते. तरीही येथील नागरिकांना सहा ते नऊ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. त्यातही वीजपुरवठा खंडित असेल किंवा जलवाहनीत बिघाड झाल्यास हे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून पडतं. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याला वैतागल्याने नागरिकांनी दोन महिन्यांपासून मोठे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला भाजपाचं पाठबळ असून आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला या प्रश्नी जाब विचारला जात आहे. मनपातील सत्ताधारी शिवसेनेने एवढ्या वर्षांपासून प्रलंबित पाणी पुरवठ्याची समस्या का सोडवली नाही, असा प्रश्न आंदोलक करत आहेत. औरंगाबादमध्ये मोठा जलाक्रोश मोर्चा काढत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला फैलावर घेतलं. तर भाजपदेखील महापालिकेत सत्तेवर असताना त्यांनी का नाही हा प्रश्न सोडवला, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील पाणी प्रश्नााच मुद्दा गाजणार आहे.
येत्या 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजप आणि मनसेतर्फे शहरातील पाणी प्रश्न उचलून धरण्यात आल्याने औरंगाबादकर नागरिकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेविरोधात संताप आहे. आता राज्य सरकारतर्फे शहरातील पाणी पुरवठ्यातील समस्या सोडवण्यासाठी आजच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन आणि औरंगाबाद मनपा यांच्यात एका समन्वय समितीची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. तसेच शहरात 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या पाणीपुरवठा योजनेला गती प्राप्त होण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता आहे.