औरंगाबादः मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा (water supply) झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पुरवठा वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल, याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक आज घेतली. यात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे ऑनलाइन माध्यमातून हजर होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणी प्रश्न पेटला असून याविरोधात नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमधून वसूल केली जात असूनही शहरवासियांना सहा ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यातही वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा जून्या जीर्ण झालेल्या जलवाहिनीत बिघाड झाल्यास हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही बारगळते. त्यातच उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. भाजपच्या नेतृत्वात नागरिकांनी नियमित पाणीपुरवठा होण्याकरिता मोठं आंदोलन केलं होतं.