औरंगाबादः आषाढी एकादशीपासून (Ashadhi Ekadashi) म्हणजेच 10 जुलैपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा होणार असल्याचा दावा मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केला आहे. सोमवारी पाण्डेय यांनी पाणी पुरवठ्याचा (Aurangabad water supply) आढावा घेण्यासाठी स्मार्ट सिटीच्या (Smart city) कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 41 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला. विविध उपाय योजनेमुळे जायकवाडी वरून येणाऱ्या पाण्यात दहा ते पंधरा एमएलडी ची वाढ झाली आहे तर हर्सूलवरून 10 ते 12 एम एल डी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का असे त्यांनी प्रत्येक अभियंत्यांना विचारले. सर्वच अभियंत्यांनी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासारखी स्थिती असल्याचे सांगितले. त्यानंतर 10 जुलैपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पांडेय यांनी जाहीर केला. मरीमाता, जिन्सी, झोन क्रमांक सहा आणि पहाडसिंगपुरा हे भाग वगळता शहरातील सर्व भागांना 10 जुलै पासून चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर 1300 अनिधकृत नळ असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले. त्यातील 350 नळ कापण्यात आल्याची माहिती वाहूळे यांनी बैठकीत दिली. उद्यापासून मनपाच्या नागरी मित्र पथकाचे सैनिक घेवून नळ खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पाणीपुरवठ्याचे कामकाज एम.बी. काझी पाहतील असेही यावेळी प्रशासकांनी सांगितले.
प्रायोगिक तत्वावर शहरातील 100 वॉल्व्हवर अत्याधूनिक यंत्रणा बसिवण्यात येईल. जेणेकरून वॉल्व्ह किती वाजता सुरू केला. किती वाजता बंद केला याची माहिती स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूमला कळणार आहे. स्मार्ट सिटीच्या जल बेल ॲपला 10 हजार पेक्षा नागरिकांनी डाउनलोड केले आहे. 10 जुलैपासून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याची अपडेट जल बेल वर पाहायला मिळेल, असेही बैठकीत सांगण्यात आले. उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या पथकाने गळत्या थांबविण्यासंदर्भात अहवाल सादर केला. त्यानुसार संबधित कनिष्ट अभियंते, उपअभियंते यांना पत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी कामच झाले नाही. गळत्या थांबल्या नाही तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या एनर्जी ऑडीटची निविदा काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहराला दररोज 200 एमएलडीची गरज आहे. सध्या 125 ते 130 एमएलडी पाणी येते. फक्त 11 एमएलडी पाणी वाढले आहे. त्यात 15 एमएलडीची तूट कायम आहे. जलकुंभ, वाहिन्यांचे जाळेही वाढलेले नाही. तसेच शहरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या गळतीवरही ठोस उपाय नाही. वितरणातही फार सुधारणा नाही. तरीही महापालिकेने चार दिवसा आड पाणी येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासकांचा हा दावा खरा ठरतो की हवेतच विरतो, याकडे औरंगााबदकरांचं लक्ष लागलं आहे.