औरंगाबादः राज्यातील उष्णतेच्या लाटेचा (Aurangabad heat wave) तडाखा औरंगाबाद आणि मराठवाड्यालाही बसत आहे. औरंगाबाद शहराचे तापमान (Aurangabad temperature) जवळपास 40 अंशांकडे वाटचाल करत आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत असून दुपारच्या वेळी रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत आहेत. मागील आठ दिवसातच शहराचे तापमान 6 ते 8 अंशांनी वाढलं आहे. तसेच पुढील पाच दिवस हवामान असेच उष्ण राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या अशा जायकवाडी धरणावरही (Jayakwadi dam) या वाढलेल्या तापमानाचा परिणाम झालेला दिसून येत आहे. होळीच्या आधीच सूर्याची प्रखरता वाढल्यामुळे जायकवाडीच्या जलाशयातून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. एका अंदाजानुसार, औरंगाबाद शहराला दररोज जेवढे पाणी लागते, त्याच्या दहापटींनी वाफ एका दिवसातच आकाशात जात आहे.
जायकवाडी धरणात सध्या 71.63 टक्के पाणीसाठा आहे. उन्हाळी पिकांसाठी सद्या डाव्या कालव्यातून 1800 तर उजव्या कालव्यातून 700 क्युसेक पाणी सोडले जात आहे. तसेच 1.479 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाण्याची वाफ एका दिवसात होत असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. औरंगाबाद शहराला दररोज 0.15 दलघमी पाणी लागते. हा विचार करता, औरंगाबादला दररोज लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत दहापट पाण्याचे बाष्पीभवन दररोज होत आहे.
धरणाच्या जलाशयातील बाष्पीभवन रोखण्याची ठराविक पद्धत असते. त्यासाठी रसायनांची फवारणी करावी लागते. मात्र जायकवाडी धरणाचे क्षेत्र हे पक्षी अभयारण्य असल्याने त्यावर रसायनांची फवारणी करता येत नसल्याचे कडाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंह हिरे यांनी सांगितले.
Past 24 hrs (17.03.2022 upto 08:30 hrs IST) Realised Weather of Vidarbha Region #WeatherReport #imdnagpur #imd pic.twitter.com/AjE9f6pyVz
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) March 17, 2022
मराठवाड्यासह राज्यात पुढील पाच दिवस हवामान असेच उष्ण राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे, शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी पाण्याचे जास्त सेवन करावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
इतर बातम्या-