औरंगाबाबादः शहरात फुड डिलिव्हरी (Food Delivery) करणाऱ्या Zomato कंपनीच्या कामगारांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. 4 मार्च ते 6 मार्च हे तीन दिवस कामगारांनी फुड डिलिव्हरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो (Zomato) कंपनीद्वारे कामगारांची पिळवणूक होत असून त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला मिळत नाही, अशी तक्रार कामगारांची आहे. जोपर्यंत कंपनी योग्य मोबदला देण्याचे कबूल करत नाही, तोपर्यंत सेवा पुरवणार नसल्याचं कामगारांनी सांगितलं आहे. औरंगाबाद शहरातील साडेतीनशे कामगारांनी यासंदर्भाने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांची भेट घेतली. कंपनी कामगारांना कशाप्रकारे वागणूक देत आहे, याची तक्रार केली. खासदार जलील यांनी कामगारांना याबाबतीत आपण कंपनीकडे लिखित स्वरुपात व्यवहार करू, असे आश्वासन दिले.
औरंगाबाद फुड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांना त्यांच्या मेहनतीनुसार, रोजगार दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. शहरात 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जाऊन फूड डिलिव्हरी करायची असते. अशा एका डिलिव्हरी मागे केवळ 20 रुपये दिले जातात, त्यातही पेट्रोलसाठी पैसे लागतात. हॉटेलमध्ये बराच वेळ थांबावे लागते, त्याचेही वेगळे पैसे मिळत नाहीत. म्हणजे पाचशे रुपये रोजगार मिळत असेल तर त्यातील तीनशे रुपये पेट्रोलसाठी खर्च होतात, अशी तक्रार झोमॅटोच्या कामगारांनी केली आहे.
औरंगाबादमधील कामगारांनी पुकारलेल्या या संपामुळे शहरातील झोमॅटोच्या सुविधेत अडथळा निर्माण होऊन कंपनीच्या या काळातील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कामगारांनी या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली. कारण कंपनीचे कोणतेही अधिकृत कार्यालय औरंगाबाद किंवा परिसरात नाही. त्यानंतर कामगारांचे नियुक्ती पत्र, नियुक्ती वेळेच्या अटी आदी कागदपत्रांसह लेखी निवेदन द्या, त्यानंतर आपण झोमॅटो व्यवस्थापनाकडे आपलं गाऱ्हाणं मांडू, असं आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. मात्र तोपर्यंत झोमॅटोची सेवा शहरातील विस्कळीत होऊ शकते.
इतर बातम्या-