बीडः पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या एका अकॅडमी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने बीडमध्ये खळबळ माजली आहे. घटना बीडच्या अंकुश नगर मध्ये घडली . राजाराम शिवाजी धस (Rajaram Dhas)वय 40 असं या क्लासचालकाचं नाव आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी एका खासगी क्लासेसच्या शाखेचं उद्घाटन केलं होतं. मागील 20 वर्षांपासून ते स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. शहरातील अंकुश नगर भागात ते ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्रही चालवत होते. मात्र काल बुधवारी रात्री अचानक त्यांनी गळफास घेतला. रात्री कुटुंबियांनी त्यांना या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना(Beed Police) देण्यात आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरीही नेमकी घटना काय घडली, याचा तपास पोलीस करत आहेत.
बुधवारी रात्री अकरा वाजता राजाराम धस यांनी कुटुंबियांसोबत जेवण केलं. त्यानंतर सगळेजण झोपण्यासाठी गेले. मात्र तीन वाजता धस यांचा लहान भाऊ उठला होता. राजराम धस यांच्या खोलीचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. त्यांनी आत पाहिलं असता धस यांनी गळफास घेतलेलं निदर्शनास आलं. भावाने तत्काळ कुटुंबियांना झोपेतून जागं केलं आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल राजाराम धस यांचा मृतदेह काढला आणि तो बीडच्या जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला.
बीड शहरातील नाथसृष्टी भागात राहणाऱ्या राजाराम धस असं मृत शिक्षकाचं नाव आहे. मागील 20 वर्षांपासून ते खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सरणी गावातील त्यांचं वास्तव्य होतं. वडील पोलिसात असल्याने राजाराम यांचं कुटुंब बीड शहरात आलं. त्यांनी काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमीत काम केलं होतं. मागील आठ वर्षांपासून ते अंकुश नगर भागात स्वतःचं ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एका खासगी क्लासेसचं उद्घाटनही केलं होतं. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पण एका रात्रीतूनच काय घडलं असावं? असा प्रश्न उभा राहिला आहे. राजाराम धस यांनी आत्महत्या केलीय की आणखी काही, याचा तपास पोलीस करत आहेत.