बीडः लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन आज गोपीनाथ गडावर आयोजित कऱण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. मुंबई, पुणे, नगर, बुलडाणा आदींसह मराठवाड्यातील नेते आज गोपीनाथ गडावर हजेरी लावतील. यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. या मुख्य कार्यक्रमाला दुपारी तीन वाजेनंतर सुरुवात होईल. विशेष म्हणजे मुंडे यांच्या स्मृतीदिनाला यंदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh Chauhan) यांची विशेष उपस्थिती असेल. दुपारी तीन वाजता शिवराज सिंह चौहान यांचं आगमन होईल, त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या सर्व आयोजनात सर्वसामान्यांना एक गोष्ट खटकतेय. ती म्हणजे पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटलांसह अनेक दिग्गज नेत्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना बोलावलेलं नाही. पण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. यामागे पंकजांची फडणवीसांची नाराजी आहे की काय, अशी चर्चा सुरु आहे. फडणवीसांना आमंत्रण दिलं नाही, याबद्दल थेट पंकजांनाच विचारलं असता त्यांनीही सफाईदारपणे उत्तर देण्याचं टाळलं.
कार्यक्रमात कोण येणार, कोणाला आमंत्रण आहे, याविषयी विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देत नसतात. ज्यांची इच्छा असते, ते नेते येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच दिग्गज नेते येथे येऊन गेले आहेत. यावेळी फक्त मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे. प्रत्येक वेळी तेच ते नेते आणण्यापेक्षा नव्या नेत्याची लोकांना ओळख व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.
गोपीनाथ गडावरील भव्य कार्यक्रमाचं आमंत्रण फडणवीस आणि त्यांच्या गोटातील भाजप नेत्यांना दिल नाही, असं दिसून येतंय. यामागे पंकजा मुंडेंची नाराजी असू शकते. कारण मध्यंतरी आझाद मैदानावर भाजपतर्फे ओबीसी आरक्षणासाठीचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला. याचं नेतृत्व चंद्रकांत पाटलांकडे होतं. मात्र ओबीसींच्या नेत्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडेंनाच यातून डावलण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील वजनदार भाजप नेत्या म्हणूनही पंकजांची ख्याती आहे. पण औरंगाबादमध्ये निघालेल्या जलआक्रोष मोर्चाचं निमंत्रण पंकजा मुंडेंना नव्हतं. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील या मोर्चात भाजपनं औरंगाबादमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या पाण्यासाठीच्या आंदोलनाचीही आठवण काढण्यात आली. मात्र पंकजांचा उल्लेखही टाळण्यात आला. पंकजा मुंडेदेखील सध्या राज्यातील राजकारणापेक्षा राष्ट्रीय राजकारणात जास्त सक्रिय झालेल्या दिसत आहेत. मात्र ही त्यांची इच्छा आहे, राष्ट्रीय पातळीवरील संधी आहे की, राज्याच्या राजकारणातून त्यांना डावललं जातंय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्या तरी गोपीनाथ गडावरून होणाऱ्या आजच्या भाषणात पंकजा मुंडे कोणते मुद्दे मांडतील, याकडे सर्वांचं लक्ष आहे.