मुंबई/औरंगाबाद : भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात (Aurangabad High court) याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली. (BJP MP Sujay Vikhe in trouble, Petition filed in bombay high courts Aurangabad bench in remdesivir Injection issue)
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे ही औषध तात्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्यप्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावं अशीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड प्रज्ञा तळेकर यांनी दिली.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. 29 तारखेपर्यंत समर्पक उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रेमडेसिव्हीरच्या काळाबाजराची न्यायालयाला शंका आहे.
त्यामुळे सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. 300 इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली.
22 एप्रिलला सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. त्यानंतर त्यांनी 24 एप्रिलला म्हणजे दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या
सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये
(BJP MP Sujay Vikhe in trouble, Petition filed in bombay high courts Aurangabad bench in remdesivir Injection issue)