छत्रपती संभाजीनगर | 19 नोव्हेंबर 2023 : राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरी मंगलकार्य आहे. त्यांचा मुलगा ॲड अब्दुल अमेर याचा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. संध्याकाळी हा विवाहसोहळा होत आहे. बीड बायपास रोडवरील एका लॉनमध्ये हा सोहळा होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील दिग्गज येणार आहेत. राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजेरी लावतील. त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. स्वतःच्या मुलीसह 555 लग्न एकत्र लावण्यानंतर सत्तार यांचे कौतुक झाले होते. त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून आली होती.
संध्याकाळी विवाह सोहळा
मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल अमेर याचा निकाह नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वधूशी होत आहे. रविवारी, 19 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी हा विवाहा सोहळा होईल. या शाही विवाह सोहळ्यासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थिती लावतील. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मुख्यमंत्री राहणार हजर
या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावतील. सायंकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरुन छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील. 6 वाजेच्या आत त्यांचे विमान छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर उतरेल. तिथून ते वाहनातून बीड बायपास येथील विवाह स्थळी पोहचतील. लग्नसोहळ्यानंतर ते परत मुंबईला जाणार आहेत.
पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ
या विवाह सोबळ्यासाठी दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांचा ताफा आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे. आज विश्वचषकाचा अंतिम सामना असल्याने आणि रविवार असल्याने शहरातील प्रमुख मार्गावर वर्दळ तशी कमी आहे. पण बीड बायपासवर संध्याकाळी वर्दळ वाढणार आहे.
मुलीच्या लग्नात सामाजिक आदर्श
एप्रिल 2018 मध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यांनी मुलीच्या लग्नासोबतच गरीब कुटुंबातील 555 मुलींचे लग्न लावले होते. एकाच मांडवात हा विवाह सोहळा झाला. त्यावेळी त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा झाली होती. त्यांनी मुलीच्या लग्नातच सामूहिक विवाह सोहळा केला. या लग्नमंडपात अनेकांचा संसार उभा केला.