गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रकांत खैरे यांचा इतिहासच काढला. शिरसाट म्हणाले,चंद्रकांत खैरे यांना वेड लागलं आहे. ते वेडाच्या भरात काहीतरी बोलत असतात. त्यांना काही आम्ही गांभीर्यानं घेत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटलं आनंद दिघे असताना त्यांनी असं केलं असतं, तसं केलं असतं. खैरे माझ्याकडून निधी घ्यायचे. दुसऱ्याला तो निधी विकायचे. हे काय टीका करणार. अशा व्यक्तीच्या टीकेला गांभीर्यानं का घ्यायचं.
कुणाची औखात काढण्यापेक्षा स्वतःची औखात पाहा ना. हा डेक्क्न फ्लोअर मिलमधला कामगार. तिथं आम्ही बसायचो ना. हा निधी घ्यायचा नि दुसऱ्याला विकायचा. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं सगळे मोठे झालेत. जसा तू झाला तसे दुसरेही झालेत, अशी एकेरी भाषेत संजय शिरसाट यांनी टीका केली.
तुझ्याकडं काय होतं. तुझ्या स्टूटरचा आवाज एक किलोमीटर यायचा. पण, आता मागचे उणेदुणे काढण्यात काही अर्थ नाही. आता मातोश्रीला हे दाखवायचं आहे की, मी शिवसेनेसाठी किती लढतोय.
शिंदे गटाविरोधात दुष्मन्या घेतो. मग आता माझं काहीतरी पुनर्वसन करा. कारण खैरे आता कधीचं निवडून येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही शिरसाट म्हणाले.
चंद्रकांत खैरे हे सायको झाले. त्यांच्या मानसिक संतुलन बिघडले मुख्यमंत्र्यांबद्दल असली विधान शिंदे गट अजिबात खपून घेणार नाही आता त्यांना धडा शिकवावाच लागेल
चंद्रकांत खैरे मोपेड वरती फिरायचे. आम्ही शिवसेना मराठवाड्यात वाढवली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या एकेरी उल्लेख करणे त्यांच्याबद्दल उलटं टांगणं हे सगळं बोलल्याबद्दल आम्ही शांत बसणार नाही. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, साहेबांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
शिवसेनेने तीन चिन्ह दिले म्हणून आम्ही द्यायचं असं काही ठरलेलं नाहीये. आम्हाला उद्यापर्यंतची वेळ निवडणूक आयोगाने दिलेली आहे. काही झालं तरी शिवसेनाही आमचीच आहे.
आमच्याकडे मेजॉरिटी आहे. आज संध्याकाळपर्यंत चिन्हावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्ही उठाव केलेला आहे. आम्ही 40 आमदार या पद्धतीने उठाव करत आलोय. आमच्या पक्षाचे चिन्ह ही तसंच असेल.
आम्ही पोटनिवडणुकीत आमचा उमेदवार देण्यावरती विचार करत आहोत. नेमकी ही निवडणूक कशी लढवायची यावरही विचार होणार आहे.
आदित्य ठाकरे यांना आता जास्त करायला लागलेत. बाळासाहेबांपेक्षाही त्यांना जास्त कळतं, असा टोलाही संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.